जळगाव जिल्ह्यात मागील १३ वर्षांत ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यातील ४९१ प्रकरणात संबंधितांच्या वारसांना शासकीय मदत देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली. म्हणजे, १७९ प्रकरणात ही मदत दिली गेली नसल्याचे दिसून येते. अमळनेरचे आ. साहेबराव पाटील यांनी विधानसभेत खान्देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी कदम यांनी धुळे तालुक्यात मागील दीड वर्षांत ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले.
निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाची कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतरही आत्महत्येचा सत्रातून सुटका झाली नसल्याचे ही आकडेवारी दर्शवित आहे. या संदर्भात आ. पाटील यांनी धुळे व जळगाव जिल्ह्यातील स्थितीविषयी विचारणा केली होती. धुळे तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्र्यांनीही मान्य केले. २०१२ मध्ये या एकाच तालुक्यात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१३ मध्ये हे सत्र सुरूच असल्याचे दिसते. या वर्षी मागील पाच वर्षांत याच तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही कदम यांनी मान्य केले.
जळगाव जिल्ह्यात मागील १३ वर्षांत ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी ४९१ प्रकरणात वारसांना शासकीय मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिलेली आकडेवारी पाहिल्यास अद्याप १७९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदतच मिळाली नसल्याचे निदर्शनास येते. धुळे तालुक्यातील प्रकरणांमध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीसाठी तगादा या निकषात बसणारी केवळ नऊ प्रकरणे आढळून आल्याचे कदम यांनी सांगितले.