डॉक्टरांच्या औषधोपचारानंतर व आजारातून बरे झाल्यानंतर १०० पैकी १८ टक्के रुग्ण उरलेली औषधे कचऱ्यात फेकून देत असल्याचे संशोधनांती स्पष्ट झाले आहे. कोटय़वधी रुपये किमतीची औषधे वाया जात असल्याने समाजाची व देशाची आर्थिक हानी होत असल्याचे बोलले जात आहे.
एका संशोधनानुसार ७० टक्के नागरिक डॉक्टरांनी लिहून दिल्याने, तर ३० टक्के नागरिक स्वत:च्या मनाने औषधांची खरेदी करतात. यानंतर आजार बरा झाल्याने ९० टक्के नागरिक औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे औषधी उरतात. औषधांचा डोस सकाळ, दुपार व संध्याकाळ, असा असताना काही लोक दिवसातून दोनदाच औषधे घेतात. दुसऱ्या फेरीत डॉक्टर औषधे बदलवून देतात. त्यामुळे पहिल्या फेरीतील औषधे शिल्लक असतात. यात सिरप, टॉनिक यासह वेदनाशामके, तापशामके, प्रतिजैविके, खोकल्याची औषधे, आम्लपित्तविरोधी औषधे, अ‍ॅलर्जीसाठीची औषधे, जीवनसत्वे, लोह, बुरशीविरोधी आदी औषधांचा समावेश असतो. यात वेदना व तापशामकांचे प्रमाण ३५ टक्के, तर प्रतिजैविकांचे प्रमाण सुमारे १३ टक्के असल्याचे दिसून आले आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सामाजिक औषध व नियंत्रणशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक लांजेवार यांनी औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा हवाला देऊन काही आश्चर्यकारक माहिती दिली. ते म्हणाले, या विद्यार्थ्यांनी औरंगाबादेतील ४८० घरांची पाहणी केली. यापैकी ४५० घरांमध्ये शिल्लक औषधे, ७२ घरांमध्ये मुदतबाह्य़ औषधे, तर ९० टक्के घरांमध्ये २१२० औषधे पडून होती. या औषधांची किंमत ३८ हजार ४०० रुपये होती. प्रत्येक घरात सरासरी ८० रुपयांची औषधे पडून होती.
१२० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात २० कोटी घरे आहेत, असे मानले तर उरलेल्या औषधांची अंदाजे किंमत १६०० कोटी होईल. यातील १८ टक्के नागरिक म्हणजे, ३०० कोटींची औषधे फेकत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या हिशेबाने विदर्भात एका वर्षांला ३० कोटींची, तर नागपूर शहरात ५ कोटींची औषधे कचऱ्यात फेकली जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या ३० कोटींमध्ये इतर नागरी सोयी उभ्या राहू शकतात, याकडेही डॉ. लांजेवार यांनी लक्ष वेधले.
घरोघरी औषधे उरतात, ही वस्तुस्थिती आहे. यातील बरीचशी पुन्हा वापरली जातात. बरे वाटल्याने औषध घेणे बंद करण्याची प्रवृत्ती आपल्या समाजात बरीच आढळून येते. अशा पद्धतीने औषधे बंद केल्यास रोग बळावण्याची शक्यता अधिक असते. उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधींवर उपचार करताना डॉक्टर सुरुवातीला एक औषध घेतात. त्याचा परिणाम पाहून ते पुढे चालू ठेवतात किंवा बदलून दुसरे घेतात.
काही वेळा एका डॉक्टरने केलेले उपचार न पटल्याने रुग्ण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. त्यावेळी रुग्ण प्रतिजैविकांचा कोर्स पूर्ण करेल काय, याचाही विचार डॉक्टरांनी केला पाहिजे, असे मतही डॉ. लांजेवार यांनी व्यक्त केले.
उरलेली औषधे संस्थांना द्या
-डॉ. निसवाडे
उरलेली औषधे वापरल्याने अनेक दुष्परिणाम होतात. जीवाणूंमध्ये औषधविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. सारख्या लक्षणांच्या मुळाशी अनेक रोग असू शकतात. त्यामुळे एकदा उद्भवलेले लक्षण परत दिसल्यास पूर्वी घेतलेले औषध पुन्हा वापरल्यास प्रसंगी जीवावरही बेतू शकते. घरात उरलेली औषधे, शासकीय रुग्णालयांकडे किंवा नि:शुल्क वैद्यकीय सेवा देणाऱ्या खासगी संस्थांना कुठलाही उशीर न करता द्यावी. असे झाल्यास गोरगरीब रुग्णांना औषधे मोफत मिळू शकतील व चुकीच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामही टाळता येईल, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.