मध्य प्रदेशच्या कापूस व्यापाऱ्याकडील १९ लाखांच्या लूट प्रकरणातील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी चोरीची कबुली दिली. अन्य दोन आरोपी फरारी आहेत. चोरीस गेलेले १९ लाख रुपये व मोटरसायकलचा शोध चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास कृषी विद्यापीठ परिसरात सायळा रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ मोटरसायकलवर आलेल्या ३ चोरटय़ांनी मारोती जििनग िलमलाचे चालक अलोक शर्मा यांचे मुनीम कमलेश गुप्ता व मोटारचालकास चाकूचा धाक दाखविला व मुनीमावर चाकूचे वार करुन गाडीतील १९ लाख ९० हजार रुपये पळवून नेले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे या बाबत तपास देण्यात आला. गुन्हे शाखेने नियुक्त केलेल्या पोलीस पथकातील हेड कॉन्स्टेबल सुरेश डोंगरे, संजय वळसे व सखाराम टेकुळे यांना गुन्ह्यातील आरोपींचे धागेदोरे हाती लागले. त्याच्या आधारे परभणीच्या परसावतनगरमधील बाबू ऊर्फ गुरू मारोतराव सावळे (वय ३४) व विजय दत्तराव पवार (वय २०) या दोघांना ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच दोघांनी चोरीची कबुली दिली. रेहान ऊर्फ सुलतान (अजिजीया नगर) व आकाश सुरेश सावळे (परसावतनगर) हे दोघे आरोपी फरारी आहेत. गुन्ह्याचा सूत्रधार गुरू सावळे याने मारोती जििनगचे कर्मचारी बँकेतून पसे काढण्यासाठी परभणी शहरात येत असल्याची माहिती मिळवून त्यांच्यावर पाळत ठेवली. मोटार अडवून चोरीचे प्रात्यक्षिकही त्याने सहकाऱ्याकडून करवून घेतल्याची माहिती तपासात समोर आली. गुरूला अटक झाली असली, तरी चोरीस गेलेली रक्कम पोलिसांच्या हाती लागली नाही. सोबतच पोलिसांना ‘त्या’ लाल रंगाच्या पल्सरचा व गुन्ह्यात वापरलेल्या चाकूचा शोध घेणे बाकी आहे.
बँकेतून पावणेदोन लाख लांबविले
परभणीत दिवसाढवळ्या लुटीचे सत्र चालूच आहे. मंगळवारी पुन्हा हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेतून १ लाख ७० हजार रुपये रक्कम असलेली बॅग लांबविण्यात आली. सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. शहराच्या मुख्य बाजारपेठेत अग्रवाल ज्वेलर्ससमोरुन मोटरसायकलच्या डिकीतून साडेदहा लाख लुटण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला. त्यानंतर आता बँकेतून रक्कम लुटण्यात आली.
वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी अशोक वाघमारे सकाळी अकराच्या सुमारास १ लाख ७० हजार रुपये घेऊन हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेत आले. बँकेत गर्दी असल्याने रोखपालासमोरील टेबलवर वाघमारे यांनी पसे असलेली बॅग ठेवली व याच वेळी मोबाईलवर त्यांचे बोलणे सुरू होते. मात्र, त्यांची नजर चुकवून चोरटय़ाने बॅग पळविली. बॅग गायब झाल्याचे लक्षात येताच वाघमारे यांनी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांना या बाबत माहिती दिली. काही वेळातच सहायक पोलीस अधीक्षक प्रणय अशोक हे सहकाऱ्यांसह बँकेत आले. बँकेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलिसांनी पाहणी केली. यात एक तरूण बॅग उचलताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी तत्काळ शहरात नाकेबंदी केली. परंतु तोपर्यंत बॅग नेणारा युवक पसार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके तयार केली. वाघमारे यांनी नवा मोंढा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
परभणीत सातत्याने लुटीच्या घटना घडत आहेत. चार दिवसांपूर्वी कृषी विद्यापीठ परिसरात कापूस व्यापाऱ्याचे १९ लाख रुपये चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. त्यानंतर सोमवारी सराफाचे साडेदहा लाख पळविण्यात आले. व्यापारी ओमप्रकाश डागा यांच्या कथित बॅग पळविल्याच्या घटनेपासून परभणीत बॅग लुटीच्या घटना वरचेवर घडत आहेत.