शहर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ अपघात झाला. रविवारी रात्री या पुलावरून राज्य परिवहन महामंडळाची बस मार्गस्थ होत असताना अंधारात धडक बसून एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. एसटी चालक सदानंद म्हसदे (४५) यांच्याविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसदे यांना अटकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची दुसरी घटना पाथर्डी फाटा परिसरातील सव्‍‌र्हीस रस्त्यावर घडली. रविवारी रात्री काही कामानिमित्त अनुपकुमार लाला प्रसाद पांडे (३०) हे पायी निघाले होते. पाथर्डी चौफुलीवर रस्ता ओलांडत असतांना टेम्पोने त्यांना धडक दिली. रुग्णालयात उपचार सुरू असताना पांडे यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालक रघुनाथ गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.