नेरुळ सेक्टर १६ येथील पंचरत्न सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या सिलेंडर स्फोटात दोन रहिवाशांचा नाहक बळी गेला असून सिलेंडरच्या नॉबमध्ये काही दोष असल्याने या सिलेंडरचा स्फोट झाल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तापसणीत आढळून आले आहे. त्यामुळे दोन रहिवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गॅसपुरवठा करणारी कंपनी आणि वितरक यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सिलेंडर गळती होण्याच्या घटना अनेक घरांमध्ये वरचेवर घडत असतात, पण त्यात सहसा स्फोट होत नाही. या घरातील देव्हाऱ्यातील दिवा किंवा उदबत्तीच्या संपर्कामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाजही पोलीस व्यक्त करीत आहेत.
सिडकोने बांधलेल्या नेरुळ सेक्टर १६ येथील पंचरत्न इमारतीतील रवींद्र तोंडवळकर यांच्या घरात सोमवारी रात्री जोरदार स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. काही मिनिटांत आजूबाजूचे चार ते पाच हजार रहिवासी पंचरत्नाजवळ जमा झाले. प्रथम बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरली होती, पण नंतर चित्र स्पष्ट झाले. इमारतीतील ६५ कुंटुंबांना बाहेर काढण्यात आले. विजेचे दिवे बंद करण्यास पुढे गेलेले सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दिघे यांच्या अंगावर छताचा मलभा पडून ते मृत्यू पावले तर संगीत दिवेकर यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळून आला. घटनास्थळी परिसरातील लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी यांनी जाऊन रहिवाशांना मदत केली. रात्रभर हे रहिवासी उघडय़ावर राहिले. मंगळवारी रहिवाशांनी स्फोटामुळे सोडलेल्या घरांचा परत आधार घेतला. या स्फोटात दिघे आणि देवकर हे दोन रहिवासी मृत्यू पावले तर बाराजण जखमी झाले असून जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घरी परतणाऱ्या रहिवाशांच्या कानात मात्र सिलेंडरमुळे झालेला आवाज आजही घुमत आहे. इमारतीतील रहिवाशांचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना पोलिसांच्या कामाला वेग आला आहे. रवींद्र तोंडवळकर यांच्या घरात हा स्फोट झाल्याने त्यांची चौकशी सध्या केली जात आहे. स्फोटातील नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी सध्या दोघांचा अपघाती मृ्त्यू म्हणून नोंद केली आहे. तोंडवळकर सकाळची तयारी म्हणून संपलेला गॅस सिलेंडर बदलून त्याजागी जवळच असलेला नवीन सिंलेडरचा नॉब बदलत असताना हा स्फोट झाला. सिलेंडरची ही गळती बराच वेळ सुरू होती असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळेच गॅसचे प्रमाण वाढून हा स्फोट झाला आहे. गॅसचा संबंध घरातील आगीबरोबर आल्याने या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याचे आढळून आले आहे.
देवापुढचा दिवा धोकादायक ?
 तोंडवळकर कुंटुंब हे भाविक असल्याने देवाबरोबरच अनेक साधू, संत, बाबांची नित्यनेमाने पूजा करतात. त्यामुळे देव्हाऱ्यात २४ तास सुरू असलेला दिवा किंवा अगरबत्तीच्या संपर्कात गॅस आल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पाोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे देवापुढे दिवा लावणे ही आपली आध्यात्मिक परंपरा असली तरी गॅस गळती होत असेल, तर ही ज्योत धोकादायकही ठरू शकते. अर्थात न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्फोटाचे नेमके कारण समजू शकणार आहे. नॉबमुळे ही गळती झाली असल्यास गॅसपुरवठा करणारी कंपनी व वितरकावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.