एकीकडे राज्यात ११ लाख शिधापत्रिकांचा मुद्दा गाजत असताना शिधावाटप दुकानावरून धान्य घेऊन न जाणाऱ्या भिवंडीतल्या २० हजार शिधापत्रिका रद्द होण्याच्या वाटेवर आहेत. शिधावाटप नियंत्रकांनी दोन महिन्यांपासून सेल ऑपटेकअंतर्गत प्रत्येक दुकानाच्या केलेल्या तपासणीमध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानातून माल घेऊन न जाणाऱ्या आणि त्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांनाही चाप बसणार असल्याचे चित्र आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी भिवंडी परिसरातील शिधावाटप दुकानात अचानक धान्याच्या कोटय़ाची मागणी वाढल्याने संशय निर्माण झाला होता. त्यामुळे शिधावाटप नियंत्रकांनी भिवंडीतील तब्बल ६० दुकानांवर सेल ऑपटेक बसविला होता. त्यामुळे प्रत्येक दुकानाची एक महिना दररोज तपासणी होत होती आणि याच तपासणीच्या पहिल्या अहवालात २० हजार शिधापत्रिकाधारक धान्यच घेण्यासाठी येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शिधापत्रिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण तपासणीदरम्यान ज्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत ते शिधापत्रिकाधारक एका महिन्याच्या आत धान्य घेण्यासाठी दुकानात गेल्यास त्यांची निलंबित करण्यात आलेली शिधापत्रिका रद्द होऊ शकते. परंतु निलंबन रद्द करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या तुरळक असल्याचे शिधावाटप यंत्रणेतील अधिकारी सांगत आहेत.
पण या कारवाईत ज्या शिधापत्रिका निलंबित करण्यात आल्या आहेत त्या लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य गेले कुठे, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. परंतु या २० हजार शिधापत्रिकांवर निलंबनाची कारवाई केल्याने मागील महिन्यात नुसत्या भिवंडीमध्ये ५२ हजार लिटर केरोसीनची बचत झाली आहे.
विशेष म्हणजे अशा प्रकारची सेल ऑपटेकची कारवाई सर्वच शिधावाटप दुकानांवर केल्यास प्रत्येक दुकानात अशा धान्य घेऊन न जाणाऱ्या आणि बोगस कमीतकमी ३०० तरी शिधापत्रिका मिळतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.