राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. प्रथम वर्ष (इंग्रजी) पुस्तकाच्या पाठोपाठ बी. कॉम. मराठीच्या पुस्तकाने चुकांचे द्विशतक ओलांडले असून असे सदोष पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासावे लागत आहे.
पुस्तकाच्या शीर्षकापासून चुकांना सुरुवात होते. ‘भाषादर्शन’ हा एकच शब्द असताना ‘भाषा दर्शन’ असे लिहिण्यात आले आहे. एखाद्या शब्दाला विशेषण लागल्यावर त्याचे जोडाक्षर तयार होते, हा नियम संपादकीय मंडळाने पाळलेला दिसत नाही. दृष्टिकोन की दृष्टीकोन, वृद्धिंगत की वृद्धींगत, पाकिस्तान की पाकिस्थान, उत्सुक की उस्तूक, सुरुवात की सुरूवात, गतिशीलता की गतिशिलता, पुरुष की पुरूष, वेरूळ की वेरुळ, रुंदी की रूंदी, घूत्कार की घुत्कार, एकांकिका की एकांकीका, विठ्ठलाचे की विट्ठलाचे, पीडित की पिडीत, नीतिमत्ता की नीतीमत्ता, आधारशिला की आधारशीला, मूलभूत की मुलभूत, पुनरुज्जीवन की पुनरूज्जीवन, योगिराज की योगीराज, आई-अगबाई की आई अगबाई, ऐकून की अैकून अशा असंख्य चुकांनी भरलेले हे पुस्तक आहे.
ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा परिचय करून देताना त्यांच्याविषयीचा अभ्यासाचा मोठा अभाव दिसून येतो. नारायण सुर्वे यांचा परिचय करून देताना त्यांच्या अनेक महत्त्वाच्या योगदानाचा आणि सन्मानांचा उल्लेखच नाही. उदाहरणार्थ ते १९९५ मध्ये परभणी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, हा त्यांच्याविषयीचा महत्त्वाचा उल्लेख पुस्तकात आलेला नाही. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले असा ओझरता उल्लेख करून त्यांची बोळवण करण्यात आली. पुस्तकात ग्रेस यांची ‘स्वप्न’ ही कविता आहे. त्यात ग्रेस यांना तीन वर्षे उशिरा जन्माला घालण्यात आले. ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७चा असताना पुस्तकात चक्क १९४० असा उल्लेख आहे. त्यांच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या ‘वाऱ्याने हलते रान’ या पुस्तकाला २०११चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. असा उल्लेख संपादकीय मंडळ करू शकले असते.
व्यावहारिक मराठी या विभागातही अशाच व्याकरणाच्या चुकांचा खच आहे. पुस्तकांची नावे लिहिताना कुठे अवतरण चिन्हे तर काही ठिकाणी ती दिलेली नाहीत. एकूणच सुमार दर्जाच्या या पुस्तकाच्या संपादक मंडळात डॉ. सिद्धार्थ बुटले, डॉ. राजेंद्र वाटणे, डॉ. गणेश मोहोड, डॉ. श्याम मोहोरकर आणि डॉ. ईश्वर सोमानाथे यांचा समावेश आहे.
व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुकांनी भरलेल्या या पुस्तकाविषयी पुस्तकाचे संपादक आणि वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यांच्याशी संपर्क साधून चुकांविषयी विचारले असता ते संतापले. चुका असल्याची एकही तक्रार आम्हाला कोणी करीत नसताना तुम्हीच का लिहिता, असा प्रतिप्रश्न करीत पेपरमध्ये चुका होत नाहीत का? असेही ते म्हणाले. मी अभ्यास मंडळाचा अध्यक्ष असताना बी.कॉम. इंग्रजीच्या पुस्तकाबाबतही तुम्ही मला विचारले नाही, असे ते संतापाने म्हणाले आणि दूरध्वनी ठेवायला सांगितला.