जगात आधुनिक चिकित्सा पद्धतीचा उपयोग करून प्रसूती दरम्यान होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले असले तरी भारतात २०१३ची आकडेवारी पाहता १ लाख महिलांमध्ये २०० महिला प्रसूती दरम्यान होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे मृत्युमुखी पडत आहे, अशी माहिती नागपूर ऑब्स्टेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. मंगला घिसाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आधुनिक चिकित्सा पद्धतीचा उपयोग करून त्यावर प्रतिबंध घालणे शक्य नाही. त्यादृष्टीने जागरूकता निर्माण करण्याबरोबरच तज्ज्ञांच्या अनुभवावरून योग्य चिकित्सा माहिती एनओजीएसच्या वतीने आयोजित वार्षिक परिषद ‘गायनॉकॉन २०१३’ माध्यमातून देण्यात येणार आहे. ही परिषद हॉटेल तुली येथे १९ आणि २० ऑक्टोबरला सकाळी १० वाजता आयोजित केली आहे. या परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागात कोणत्याच सोयीसुविधा नसताना करण्यात येणाऱ्या प्रसूतीविषयी अनुभव कथन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इमर्जन्सी ऑब्स्टेस्ट्रिक ऑपरेशनचे थेट प्रसारण दाखविण्यात येणार आहे.
परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. विकास आमटे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अलका मुखर्जी, डॉ. अनघा आमटे, रूपेश्री भोयर उपस्थित राहणार आहेत. डॉ. सुतप्पा रॉय, डॉ. प्रमोद सहारे, डॉ. प्रज्ञा गिजरे, डॉ अंकिता कोठे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.