निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून शहरातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष असून सानपाडय़ात दोन तरुणांकडून २१ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली असून ऐरोलीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांपैकी एका पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही कारवाई खंडणीविरोधी पथकांकडून करण्यात आल्या आहेत.
सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी खंडणीविरोधी पथकाने नीलेश डुंबरे आणि सतीश दाबी या तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेतून पोलिसांना २१ लाख ३२ हजार ८०० रुपयांची रोकड मिळाली. दोघेही तरुण मुंबईतील रहिवासी आहेत. त्याच्याकडे इतके पैसे कसे याची चौकशी पोलिसांनी केली असता त्यांनी त्याचे समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर याची माहिती पोलिसांनी निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर खात्याला देण्यात आली असून या अधिकाऱ्यांनी ती रक्कम ताब्यात घेतलेली आहे. हे पैसे या तरुणांनी आणले कोठून आणि कोणाला देण्यासाठी निघाले होते याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दुसऱ्या कारवाईत खंडणीविरोधी पथकाला रबाळे परिसरात पिस्तूल विक्रीसाठी दोन तरुण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ऐरोली स्थानक परिसरात दोघे जण पिस्तूल घेऊन आले होते. त्यांच्या संशयित हालचालीवरून पोलिसांनी त्यांना हटकले असता, दोघेही पळू लागले. त्यातील सुरेश ओमप्रकाश सिंग याला पोलिसांनी अटक केली. दुसरा तरुण तेथून पळून गेला. पळत असताने त्याने त्याच्याकडील पिस्तूल तेथेच टाकले होते. या पिस्तुलासह सिंग याच्याजवळ असलेले एक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पळून गेलेला तरुण हा सख्खा भाऊ असल्याची माहिती सिंग यांनी पोलिसांना दिली.