मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या प्रस्तावित शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून सागरी सेतूबाधित शेतकऱ्यांना सिडकोने २२.५ टक्के विकसित भूखंडाचे पॅकेज देण्यास होकार दर्शविला आहे. सागरी सेतूसाठी उरण व पनवेल तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या,मात्र शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध करीत वाढीव विकसित भूखंडाची तसेच गावांसाठी नागरी सुविधांची मागणी केली होती. या संदर्भात नुकत्याच सिडको, एमएमआरडीएचे अधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंकबाधित शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळबाधित शेतकऱ्यांप्रमाणे २२.५ विकसित भूखंड देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंक उरणमधील राष्ट्रीय महामार्ग ४ बपर्यंत येत असल्याने उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, तर पनवेलमधील न्हावा, गव्हाण व शेलघर येथील ४९४ खातेदारांची २७.९९ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये चिर्ले येथील १९१ खातेदारांची ४.३५ हेक्टर, जासई २८३ खातेदारांची १५.०९ हेक्टर, तर गव्हाणमधील २३ खातेदारांची ७.६६ हेक्टर आहे. जमिनीचे भूसंपादन करण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने पुढाकार घेऊन जासईमधील ६२ शेतकऱ्यांच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीच्या नऊ वर्षांच्या ४६ लाख रुपयांच्या भुईभाडय़ांचे वाटप काही दिवसांपूर्वी केले होते, तर २० डिसेंबर रोजी शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंकच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात येत असल्याने, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, एमएमआरडीएचे उपायुक्त अनिल वानखडे शेतकरी समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, सल्लागार महेंद्र घरत यांच्यासह झालेल्या बैठकीत समितीच्या मागणीनुसार २२.५ टक्के विकसित भूखंड देण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात रविवारी जासई येथे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिडकोच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली असली तरी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूला शेतकऱ्यांचे नेते दिवंगत माजी खासदार दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समिती अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.