तेवीस लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांच्या १४२ मोबाइल हॅण्डसेटची चोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
एमआयजी कॉलनी, हिवरीनगरातील विक्रम मोहनलाल चुग (३२) यांचे सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील टेलीफोन एक्सचेंज चौकात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. त्यांनी गुरुवारी सायंकाळी ५.२४ वाजताच दुकान बंद केले. दुकानातील नोकरांनाही त्यांनी सुटी दिली. मध्यरात्रीनंतर चोरांनी दुकानात प्रवेश केला. यानंतर त्यांनी सोनी कंपनीचे ३० नग, एचटीसी कंपनीचे २८ आणि सॅमसंग कंपनीचे ८४ असे एकूण १४२ मोबाईल्स तसेच दुकानात ठेवलेले मोबाईलच्या विक्रीचे एक लाख रुपये, असा एकूण २३ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.  
पहाटे पाच वाजताच्या सुमारास विक्रम चुग यांच्या मोबाईलवर चोरी झाल्याचा संदेश आला. यावरून त्यांनी त्वरित दुकान गाठले. लगेच त्यांनी ही माहिती लकडगंज पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून शहरातील चोरटय़ांवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्या काही दिवसांतील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मोबाईल चोरीची ही पहिलीच घटना आहे.