हबल या अंतराळ दुर्बीणीस २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येथील शंकराचार्य न्यास आणि सायन्स फोरम यांच्या वतीने आयोजित  विशेष कार्यक्रमात डॉ. गिरीश पिंपळे यांनी हबल दुर्बीणीचे अंतरंग उलगडण्यासह या दुर्बीणीची आवश्यकता, अंतराळातील संशोधन याविषयी चित्रफितींसह माहिती दिली.
२४ एप्रिल १९९० या दिवशी अमेरिकेच्या नासा या संस्थेने एका अभूतपूर्व आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली. त्याचे नाव हबल अंतराळ दुर्बीण. विसाव्या शतकात होऊन गेलेल्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञांचे नाव या दुबीणीला देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आल्याचे डॉ. पिंपळे यांनी नमूद केले. अतिविराट विश्वासंबंधी या दुर्बीणीने इतकी प्रचंड आणि मोलाची माहिती दिली आहे की या क्षेत्रात मोठी क्रांतीच घडली आहे.  खगोलविषयक माहितीचे  त्यामुळे आता ‘हबल पूर्व’ आणि ‘हबलोत्तर’ असे दोन भाग पडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
डॉ. पिंपळे यांनी विश्वाचा पसारा, जगातील मोठय़ा दुर्बीणी, अंतराळ दुर्बीणची आवस्यकता यांची तपशीलवार माहिती देण्यासह ‘जग’ आणि ‘विश्व’ यातील फरक नेमकेपणाने स्पष्ट केला. हबल दुर्बीण एक भले मोठे धूड असून त्याचे वजन सुमारे तीन हत्ती एवढे आहे. ही दुर्बीण सेकंदाला सुमारे आठ किलोमीटर एवडय़ा प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरत असून ती अवघ्या ९६ मिनिटात एक पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण करते. ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५६९ किलोमीटर उंचीवर असून तिचे संपूर्ण नियंत्रण पृथ्वीवरून केले जात आहे. ही दुर्बीण अंतराळात सोडल्यानंतर काही काळाने तिच्यात बिघाड निर्माण झाल्याने तिची चार वेळा अंतराळात दुरूस्ती करण्यात आली. त्यासाठी अंतराळवीर अंतराळात चक्क ‘चालले’ अशी मनोरंजक माहितीही डॉ. पिंपळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल हे होते. सायन्स फोरम बद्दलची माहिती अनील क्षत्रिय यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मोबाईलच्या सहाय्याने रोबोचे दूरनियंत्रण कसे करावयाचे, याचे प्रात्यक्षिक डॉ. प्रवीण जोशी यांनी करून दाखविले. आभार सुजाता बाबर यांनी मानले.