प्रवासात विरंगुळा म्हणून आपण आपल्याजवळ वाचण्यासाठी एखाद-दोन पुस्तके ठेवतो. ती पुस्तके वाचून झाली की काय असा प्रश्न पडतो. कारण जास्त पुस्तके जवळ ठेवायची म्हटली तरी त्याच्या ओझ्यामुळे ते शक्य होत नाही. आपल्या घरातही आपण पुस्तकांसाठी शोकेस/कपाट करतो. पुस्तके विकत घेतल्यानंतर त्यांची संख्याही वाढत जाते आणि इतकी पुस्तके ठेवण्यासाठी मग नवी सोय करावी लागते. पण एक-दोन, वीस-पंचवीस नव्हे तर विविध विषयांवरील अडीचशे पुस्तके आपल्याला एकत्र मिळाली आणि त्याचे ओझेही फार नसेल तर?..
हो, हे शक्य केले आहे ‘ई साहित्य प्रतिष्ठान’ने. गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवरील मराठी पुस्तके ई-बुक स्वरूपात प्रकाशित करून ती आपला ई-मेल आयडी कळवला तर अनेकांना मोफत पाठविण्याचे काम ई-साहित्य प्रतिष्ठान करत आहे. महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यांची माहिती देणारी दहा पुस्तके आत्तापर्यंत प्रतिष्ठानने प्रकाशित केली आहेत. ई-साहित्य प्रतिष्ठानतर्फे दर आठवडय़ाला एक ई-बुक प्रकाशित केले जाते. अशा पुस्तकांची संख्या सुमारे पावणेतीनशे झाली आहे.
काही वर्षांपूर्वी आम्ही प्रकाशित केलेल्या ‘बालभारतीतील कविता’ या ई-पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या आठवणींच्या कप्प्यात असलेल्या शालेय अभ्यासक्रमातील अनेक उत्तमोत्तम कवितांचे संकलन या पुस्तकात केले होते. आता येत्या १० मार्च रोजी प्रसिद्ध लेखक विक्रम भागवत यांची ‘धांडोळा’ ही कादंबरी पहिल्यांदा ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे. भागवत यांनी यापूर्वी ‘अफलातून’, ‘एक शून्य रडते आहे’, आदी नाटके तसेच ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘एक शून्य शून्य’ आदी मालिकांचे लेखन केले आहे. आम्ही आत्तापर्यंत जी ई-पुस्तके प्रकाशित केली त्यात महाराष्ट्राच्या इतिहासापासून ते कवितांपर्यंत, ज्ञानेश्वरीपासून ते कादंबरीपर्यंत आणि विनोदापासून ते तरुणांच्या साहित्यापर्यंत विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. चित्रकला, पाककला, अर्थशास्त्र, कामजीवन आदी विषयही प्रतिष्ठाने हाताळले आहेत. प्रकाशित झालेली ही पुस्तके वाचक पुढे पुढे पसरवत असतात. ही सर्व पुस्तके दीड लाख वाचकांपर्यंत पोहोचली असल्याचे प्रतिष्ठानचे सुनील सामंत यांनी सांगितले.
ई-साहित्य प्रतिष्ठानची आत्तापर्यंत प्रकाशित झालेली अडीचशे पुस्तके आता एका सीडीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती अवघ्या दीडशे रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी maneanand7@gmail.com   या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.