लहान मुलेसुद्धा मोठय़ांना अनेकदा खूप काही शिकवून जातात. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्रसार करण्यासाठी लहान मुलांचाच उपयोग करून घेण्याचे आता ‘केशवसृष्टी’ आणि ‘अर्हम् युवा ग्रुप’ या दोन संस्थांनी ठरवले आहे. या दोन संस्थांतर्फे ४ आणि ५ जानेवारी २०१४ रोजी केशवसृष्टी येथे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात अपारंपरिक ऊर्जास्रोतांबाबत जनजागृती आणि माहिती देण्याचे काम होणार आहे. या उपक्रमाचाच भाग म्हणून ‘सूर्यकुंभ’ या कार्यक्रमात केशवसृष्टीत तब्बल तीन हजार मुले एकत्र येऊन सौरचुलीवर एकत्र स्वयंपाक करणार आहेत. या उपक्रमामुळे या तीन हजार मुलांमध्ये आणि त्यांच्यामुळे तीन हजार कुटुंबांमध्ये सौरऊर्जेबद्दल जागरूकता निर्माण होईल, असा अंदाज केशवसृष्टीच्या अध्यक्षा डॉ. अलका मांडके यांनी व्यक्त केला.
केशवसृष्टीमध्ये दरवर्षी ‘केशवसृष्टी महोत्सव’ आयोजित केला जातो. यंदा या महोत्सवाचे २५वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने अपारंपरिक ऊर्जास्रोतांची माहिती लोकांना व्हावी, लोकांनी दैनंदिन गरजेसाठी हे ऊर्जास्रोत वापरावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून केशवसृष्टीने ‘सूर्यकुंभ’ हा उपक्रम राबवायचे ठरवले आहे.
काय आहे ‘सूर्यकुंभ’?
‘सूर्यकुंभ’ उपक्रमात केशवसृष्टीतील शाळांबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई या जिल्ह्य़ांतील शाळांमधील सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना छोटीशी सौरचूल दिली जाणार आहे. ही चूल कशी लावायची, त्यावर अन्न कसे शिजवायचे याची माहितीही त्यांना करून दिली जाणार आहे. ४ जानेवारी रोजी ही तीन हजार मुले केशवसृष्टी येथील मैदानात एकत्र येणार आहेत. तेथे सर्वजण आपापल्या सौरचुलींवर आपला आवडता पदार्थ बनवणार आहेत आणि एकत्रितपणे त्याचा आस्वादही घेणार आहेत. या उपक्रमासाठी ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे. कार्यक्रमानंतर ही सौरचूल मुलांना घरी घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे मुले याबाबत त्यांच्या पालकांना माहिती देऊ शकतील आणि सौरचुलीचा वापर करून गॅसची बचत करू शकतील. या ‘सूर्यकुंभा’ची नोंद ‘गिनीज बुक’मध्येही होणार आहे.
या उपक्रमासाठी मुंबई, ठाणेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी हजेरी लावावी, असा केशवसृष्टीचा प्रयत्न आहे. या दोन दिवसांमध्ये अपारंपरिक ऊर्जास्रोतांबद्दल चर्चासत्रे, असे ऊर्जास्रोत वापरणाऱ्यांचा अनुभव कथनाचा कार्यक्रम, असेही उपक्रम होणार आहेत.
‘रज्जूभैया एनर्जी पार्क’
याच दिवशी केशवसृष्टीमध्ये ‘रज्जूभैया एनर्जी पार्क’चेही उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नावाने सुरू होणाऱ्या या ऊर्जा उद्यानात अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर चालणारी उपकरणे असतील. केशवसृष्टीच्या २०० एकर परिसरात विविध ठिकाणी हे उद्यान पसरले असेल. यात बायोगॅस, सौरऊर्जा, शक्य झाल्यास पवन ऊर्जा आदी विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टी सुलभ करण्यात येणार आहेत. या उद्यानाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी होणार असले तरी त्याआधीच केशवसृष्टीच्या कार्यालयातील विजेची गरज सौरऊर्जेवर भागवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.