उरण (मोरा) ते भाऊचा धक्का (मुंबई) दरम्यानच्या जलवाहतूक सेवेत आधुनिक पद्धतीच्या स्पीड बोटींची सोय करण्यात आली आहे. या स्पीड बोटींच्या वापरामुळे मोरा बंदरातील प्रवाशांच्या संख्येत ३० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. मात्र  प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बंदरात सुविधा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती बंदर विभागाने दिली आहे.
उरण ते मुंबई हा रस्त्याच्या मार्गाने साठ किलोमीटरचा प्रवास आहे. त्याकरिता दोन तास खर्ची घालावे लागतात. यामध्ये वाहतूक कोंडी झाल्यास हाच प्रवास अडीच ते तीन तासांचाही होतो.  मोरा ते मुंबई अशी जल वाहतूक सेवा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सुरू आहे. बारमाही असलेल्या या सेवेमुळे पूर्वी एका तासात मुंबई गाठता येत होती; परंतु अनेकदा जुन्या बोटींमुळे या प्रवासातही वेळ जाऊ लागला होता. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने या मार्गावर स्पीड बोटींची परवानगी दिल्यानंतर येथे स्पीड बोटी सुरू केल्या आहेत. प्रवासी भाडे हे जुन्या बोटींपेक्षा सात रुपये अधिक असले तरी या बोटीने अवघ्या अध्र्या तासातच मुंबईत पोहोचता येते. वेळ वाचत असल्याने या मार्गाने जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. जुन्या बोटीतून दररोज ७५० ते ८०० प्रवासी प्रवास करीत होते. सध्या यामध्ये वाढ होऊन ही संख्या १२०० पर्यंत पोहोचली आहे. मोरा जेटीवरील प्रवाशांच्या वाहनांसाठी असलेली पार्किंगची जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे जेटीवरील प्रवाशांच्या संख्येनुसार सुविधा पुरविण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या संदर्भात मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांच्याशी संपर्क साधला असता प्रवाशांकरिता सुविधा पुरविण्यात याव्यात याकरिता जेटीची लांबी वाढवण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे आपण पाठपुरावा करीत असल्याचे कोळी यांनी सांगितले.
फोटो – २५ उरण स्पीड बोट