लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईत तब्बल ३२ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून गेल्या काही दिवसात १४ हजार लोकांची धरपकड करण्यात आली आहे.
 मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी १ हजार ५२८ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ३८ पोलीस उपायुक्त, ४६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४७७ पोलीस निरीक्षक, १९५१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच ३० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस बलाच्या १९ तुकडय़ा आणि निमलष्करी दलाच्या ८ तुकडय़ांचा समावेश आहे. ५ हजार २७५ होम गार्ड्स मदतीला असून २५० साध्या वेषातील पोलीसही लक्ष ठेवून असणार आहेत.
 या बंदोबस्ताबाबत बोलताना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, आम्ही सर्व आव्हानांना तोंड देण्यास तयार आहोत. सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. गेल्या महिनाभरात परवानाधारक १ हजार ५६४ शस्त्रे जमा केली असून ५० बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. १८ हजार ८६५ लोकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजाविण्यात आल्या असून १४ हजार ८१६ लोकांची धरपकड करण्यात आली आहे. एकूण १०८ भरारी पथके संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केली आहेत. अंमली पदार्थ विरोधी मोहीम उघडून ४ हजार ७२८ जणांना अटक करण्यात आली आहे. या निवडणुकीत कुठलीही धमकी अथवा दहशतवादी हल्ल्याच्या सूचना नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत एकूण ५ कोटी ३४ लाख रुपये एवढी रोकड जप्त करण्यात आली असून त्याबाबत निवणडूक आयोग आणि प्राप्तीकर खात्याला कळविण्यात आले आहे. निवडणुकीसंदर्भातले एकूण १८ गुन्हे आणि २२ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.