कधीही रोजगार उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून ‘बी.फार्म.’ची ख्याती आहे. मात्र, याही अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी फारसा रस न दाखवल्याचे यावर्षीच्या प्रवेशाच्या आकडेवारीवरून सिद्ध होते.
इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच औषधनिर्माणशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.फार्म.) जागांचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालय करीत आहे. ‘बी.फार्म.’ केल्यानंतर एखाद्या मेडिकल दुकानात किंवा स्वत:चा व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा होतो. शिवाय निरनिराळ्या औषध कंपन्यांकडूनही ‘बी.फार्म.’च्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असते. मात्र, जेमतेम ३८.५२ टक्के प्रवेश या अभ्यासक्रमात झाले आहेत. ‘कॅप’च्या दोन फेऱ्या होऊनही केवळ ३१४ प्रवेश झाले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने दाखवलेली रिक्त जागांची संख्या नागपूर विभागात ५०१ एवढी आहे.
नागपूर विभागात ‘बी.फार्म’च्या एकूण ९३० जागा आहेत. त्यातील ८१५ जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) भरायच्या आहेत. ‘कॅप’च्या दुसऱ्या फेरीनंतर केवळ ३१४ जागा भरण्यात आल्या असून ५०१ जागा रिक्त आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ‘बी.फार्म.’ची एकूण १६ महाविद्यालये आहेत. अभियांत्रिकी, ‘एमबीए’प्रमाणेच एकाही महाविद्यालयातील ‘बी.फार्म.’च्या पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. आश्चर्य म्हणजे वध्र्याच्या डॉ. राजेश भोयर यांच्या ‘बी.फार्म.’ महाविद्यालयातील ६० जागांपैकी एकाही जागेवर प्रवेश झालेला नाही. ब्रम्हपुरीच्या बेटाळा येथील महाविद्यालयातील प्रवेश क्षमता ४८ आहे. मात्र, त्याहीठिकाणी एकही प्रवेश झालेला नाही.
याउलट कामठीच्या महाविद्यालयातील प्रवेश समाधानकारक आहेत. तेथील किशोरी भोयर फार्मसी महाविद्यालयाच्या ६० पैकी ५१ जागा तर बोरगाव मेघे येथील फार्मसी संस्थेत ४८ पैकी ३४ जागा भरल्या गेल्या आहेत.
‘कॅप’ची पहिली आणि दुसरी फेरी केव्हाच संपली असून ‘कॅप’ची तिसरी फेरी उद्या, ३१ जुलैपासून सुरू होत आहे. तिसरी फेरी समुपदेशनाची फेरी राहील. ‘बी.फार्म.’च्या १६ महाविद्यालयांपैकी अनेक महाविद्यालयांमध्ये एक अंकी प्रवेश झाले आहेत. समुपदेशन फेरीत आणखी काही जागांवर प्रवेश होतील, अशी अपेक्षा आहे.