उष्णतेच्या तडाख्यामुळे आधीच ग्रामीण भाग होरपळत असताना गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाने सटाणा तालुक्यात कित्येकांचे संसार उद्ध्वस्त केले. वादळामुळे चुलीचा भडका होऊन लागलेल्या आगीत ४० शेळ्यांसह दोन गायी होरपळल्या, तर ५० हून अधिक कुडाची घरे भस्मसात झाली.
सटाणा शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या अचानकनगर परिसरात ८० पेक्षा अधिक शेतमजुरांची कुडाची घरे आहेत. दिवसभर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतमजुरांना गुरुवारी सकाळी वावटळीने घेरले. सकाळी नेहमीप्रमाणे शेतमजूर कामावर जाण्याची तयारी करीत असताना ११ वाजेच्या सुमारास जोरदार वावटळ आली. या वावटळीमुळे या वस्तीतील एका घरातील चुलीचा भडका उडाला. अध्र्या तासाच्या आत ही आग वेगाने पसरत गेली आणि वस्तीतील ५० घरे आगीच्या विळख्यात सापडली. आगीत घराच्या अंगणात बांधलेल्या ४० शेळ्या आणि दोन गायीही होरपळल्या. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अश्विनकुमार पोतदार, प्रांत संजय बागडे, पोलीस निरीक्षक आनंदा माहिते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे ५० कुटुंब उघडय़ावर पडले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था तहसीलदारांकडून करण्यात आली. त्यांना पुढील काही दिवस मदत करण्याची ग्वाही नागरिकांनी दिली आहे. प्रशासनाने पावसाळ्याआधी झोपडय़ा बांधून देण्याची मागणी या वेळी पीडित कुटुंबीयांनी केली.