फॅशनचे चित्र ठरावीक काळानुसार बदलत असले, तरी त्यातून तावून सुलाखून पुरुषांचे शर्ट मात्र कित्येक वर्षे आपली शैली टिकवून आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढत असून त्यानुसार शर्टचे मापही वाढत आहे. गेल्या काही काळात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांतही ४२ आणि ४४ या मापांच्या शर्टची सख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसून आले आहे. रोज कामावर जाताना वापरात येणाऱ्या शर्टमधून डोकावणारा पोटाचा घेर लपवण्यासाठी मोठय़ा मापाच्या पण ‘स्ट्रेट फिट’ शर्टची मागणी वाढली आहे.
पुरुषांचे ‘फॉर्मल शर्ट’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर लूझ फिट, खालून अर्धवर्तुळाकार आकार अशा फॅशनचे शर्ट समोर येतात. आता शर्टबाबतची ही पुरुषांची मागणी बदलू लागली आहे. वाढते वजन व त्यानुसार वाढत जाणारा पोटाचा घेर यामुळे मोठय़ा मापाच्या शर्टची मागणी वाढली आहे. ३८, ४० पेक्षा ४२, ४४ या मापाच्या शर्टची मागणी दुपटीने वाढल्याचे ‘सियाराम’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश पोदार यांनी सांगितले. विशेष म्हणजे शर्टचे माप वाढले तरी ‘आपण बारीक दिसावे’ यासाठी पुरुष आग्रही आहेत. त्यामुळेच ‘स्ट्रेट फिट’, आखूड बाह्य़ांच्या ‘स्लिम फिट’ शर्टची मागणी वाढत आहे.
रंगांच्या बाबतीतही या मानसिकतेचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. पूर्वीच्या ‘डल’ रंगांची जागा जांभळा, हिरवा, निळा अशा गडद रंगांच्या आणि त्याचबरोबर गुलाबी, पिवळा, पोपटी अशा फिकट रंगांच्या शर्टना जास्त पसंती आहे. तसेच मोठय़ा चेक्सऐवजी मायक्रो चेक्स, बारीक पट्टय़ा, छोटे डॉट्स पसंत केले जात आहेत.