जिल्हा योग संघटना आणि शिशुविहार मराठी माध्यम बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत २८ शाळांमधील ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन संघटनेच्या अध्यक्षा डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे विभागीय अध्यक्ष डी. के. कुलकर्णी, दत्तात्रेय काळे, नरेंद्र वाणी, जिल्हा संघटक संजय होळकर, मुख्याध्यापिका मानसी बापट आदी उपस्थित  होते. शिशुविहार बालक मंदिर शाळेतील खेळाडूंनी शैलजा पाटील, कविता क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक दाखविले. स्पर्धेतील पहिल्या सहा क्रमांकांना प्रत्येक वयोगटात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या विविध गटांमध्ये श्रावणी मोरे, श्रीराम निफाडे, ओंकार महाले, गार्गी महकरी, शिल्पी सिंग, संग्राम महाले, उद्देश सोनवणे, वर्षां राऊत, वंदना कोरडे यांनी यश मिळविले. ३५ वर्षांपुढील गटात ज्योत्स्ना अहिरे, सुनील ढमाले यांनी यश मिळविले. प्रथम तीन क्रमांकाने विजयी खेळाडूंची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी झाली असून नाशिक जिल्हा संघ स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहिती संघटनेचे सचिव सुभाष खाटेकर यांनी दिली.