विकासाआड येणाऱ्या वृक्षांची कत्तल आणि दुकानदारांना नकोशा झालेल्या झाडांचा अवकाळी मृत्यू हे प्रकार मुंबईकरांना नवीन नाहीत. पण योग्य ती निगा राखण्यात अपयशी ठरलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अवघ्या चार दिवसांच्या पावसामध्ये मुंबईतील तब्बल ४८२ झाडांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहत आहेत. तसेच रस्ता रुंदीकरण आणि पदपथांचे अरुंदीकरण अशा योजना मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येत आहेत. या योजना आणि पुनर्विकासाआड येणाऱ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. पुनर्विकासासाठी कत्तल करण्यात येणाऱ्या एका झाडाच्या बदल्यात दोन झाडांची लागवड करण्याची सक्ती पालिकेने केली आहे. मात्र विकासकांनी खरोखरच लागवड केली आहे का याची पडताळणी करण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे विकासकांचे फावले आहे.
मुंबई हिरवीगार व्हावी म्हणून अनेक ठिकाणी पदपथांवर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र हे वृक्ष दुकानाआड येत असल्याने ते दुकानदारांना नकोसे झाले आहेत. परिणामी चुन्याचे पाणी अथवा रसायनांचा वापर करून दुकानदार झाडाचा कायमचाच बंदोबस्त करतात. पालिका अधिकारी मात्र अशा प्रकारांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वर्षभर अशी वृक्षांची छुपी कत्तल होत असताना पावसाळ्यातही वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये चार दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसात तब्बल ४८२ वृक्ष उन्मळून पडले. यापैकी बहुतांश वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. पावसाला आता कुठे सुरुवात झाली असताना इतक्या मोठय़ा संख्येने वृक्ष कोसळले. उर्वरित काळात मुंबईत पडती झाडे पाहण्याची वेळ मुंबईकरांवर येणार आहे.
मुंबईमधील वृक्षांच्या संवर्धनासाठी महापालिकेने गेल्या वर्षी एक समिती नेमली होती. बीएआरसीमधील तज्ज्ञ मंडळींसह अन्य तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या समितीची आजतागायत केवळ एकच बैठक झाली. मुंबईतील काही वृक्षांची पाहणीही या समितीने केली होती. तसेच उन्मळण्याच्या बेतात असलेल्या वृक्षांची छाटणी करून त्यांचे संवर्धन कसे करावे याबाबत समितीमधील तज्ज्ञांनी शिफारसही केली होती. परंतु पालिकेने या शिफारशी बासनात गुंडाळून ठेवल्या. अन्यथा वृक्षांचे संवर्धन झाले असते, असा गौप्यस्फोट या समितीमधील सदस्य डॉ. अल्मेडा यांनी केला आहे.
वृक्ष संवर्धनासाठी पालिकेने प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये एका वृक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. परंतु त्यापैकी अनेकांना वृक्ष संवर्धन म्हणजे काय हेच माहीत नाही. कोणते निकष लावून या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, असा सवाल करून डॉ. अल्मेडा म्हणाले की, वृक्षसंपदेविषयी अभ्यास असलेला, वृक्षांबद्दल प्रेम असलेल्या तज्ज्ञ मंडळींची वृक्ष अधिकारी म्हणून नेमणूक करणे गरजेचे आहे. जोपर्यंत अशा महत्त्वाच्या पदांवर वृक्ष तज्ज्ञांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मुंबईत वृक्षांची पडझड होतच राहणार.
झाडांची लागवड करण्यासाठी चार फुटांचा खड्ड खणण्याची गरज असते. परंतु उथळ खड्डा खणून झाडे लावली जातात. तसेच काही वेळा खणलेल्या खड्डय़ात दगड असल्यामुळे झाडाच्या मुळांना खोल जमिनीत जाता येत नाही. वरचेवर पसरणाऱ्या मुळांमुळे झाडाला पकड मिळत नाही आणि ते उन्मळते. तसेच काही झाडांची मुळे खोलवर जाण्याऐवजी जमिनीलगत पसरतात. अशा झाडाच्या मुळांची काळजी घेणे गरजेचे असते. परंतु उपयोगीता सेवा कंपन्यांच्या कामांसाठी खोदकाम करताना वृक्षांच्या जमिनीलगत फोफावलेल्या मुळांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडतात, असेही डॉ. अल्मेडा म्हणाले.