येवला तालुक्यात दरोडेखोर आणि लुटारुंनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून मंगळवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची ५० लाखांची रोकड डोळ्यात मिरचीची पुड फेकून लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एखाद्या चित्रपटातील थरारक नाटय़ाप्रमाणे चोरटय़ांनी या घटनेला मूर्त स्वरुप दिले. पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी मिरचीची पूड फेकून रोकड घेत वैजापूरच्या दिशेने पलायन केले. या घटनेआधी सोमवारी रात्री अंगुलगाव येथे दरोडेखोरांनी पुन्हा धाडसी दरोडा टाकून ५९ हजाराची रोकड लांबवली. या गावात दहा दिवसात पडलेला हा दुसरा दरोडा आहे.
मागील काही दिवसात ग्रामीण भागात लुटमार, दरोडा या घटनांचा आलेख उंचावत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास ५८ किलो सोन्याची लूट झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाडसी लुटीचा प्रकार येवला तालुक्यात घडला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येवला शाखेतुन दुपारी अंदरसुलला ५० लाखाची रोकड घेऊन बँक व्यवस्थापक आर. के. महाले व शिपाई भारती यांच्यासमवेत रिक्षाने निघाले होते. येवला ते अंदरसूल सहा किलोमीटर अंतर आहे. रिक्षा अंदरसुलच्या दिशेने जात असताना पल्सर मोटारसायकलवरून दोघे जण आले. त्यांनी रिक्षाचालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. अचानक झालेल्या या प्रकाराने चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा खड्डात गेली. यावेळी चोरटय़ांनी काठीने व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या डोळ्यात पुन्हा मिरचीची पुड फेकली. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन ५० लाखाची रोकड असणारे पोते घेऊन चोरटय़ांनी वैजापूरच्या दिशेने पलायन केले.
जखमी झालेल्या व्यवस्थापकांनी पोलीस व बँकेच्या येवला शाखेशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले. एनडीसीसीच्या येवला शाखेतुन दोन ते तीन दिवसांच्या कालावधीनंतर रोकड रिक्षाद्वारे अंदरसुल शाखेत नेली जाते. पाळत ठेऊन कोणी माहितीगार व्यक्तीने लुटमार केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी व बँकेच्या येवला शाखेत भेट दिली. या प्रकरणी येवला ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध युध्दपातळीवर घेतला जात आहे. आसपासच्या जिल्ह्यातही संशयितांची माहिती देऊन यंत्रणेला सतर्क करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.
दरम्यान, दिवसाढवळ्या इतकी मोठी रक्कम लंपास झाली असताना सोमवारी रात्री अंगुलगाव येथे दरोडेखोरांनी पुन्हा धाडसी दरोडा टाकून ५९ हजाराची रोकड लांबविली. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. येवला शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर अंगुलगाव आहे. दहा दिवसांपूर्वी अंगुलगाव-तळवाडे रस्त्यावर दरोडेखोरांनी जगझाप व झाल्टे वस्तीवर दरोडा टाकून ९ तोळे सोने व २५ हजाराचा ऐवज लुटला होता. त्याच गावात पुन्हा हा प्रकार घडल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सोमवारी रात्री एकच्या सुमारास गज, कोयते व हत्यारे घेऊन दहा ते बारा दरोडेखोरांनी खडी क्रशरजवळील दत्तु भिकाजी जाधव यांच्या वस्तीवर हल्ला चढविला. घरातील मंडळी लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेली होती. दरोडेखोरांनी आधी आसपासच्या घरांना बाहेरून कडय़ा लावल्या. दत्त जाधव यांना मराठी व हिंदी भाषेत त्यांनी दरडावत मारहाण केली. ५९ हजार रुपयांची रोकड काढून घेतल्यावर त्यांना दोरखंडाने बांधून ठेवले. दरोडेखोरांच्या दहशतीमुळे कोणी घराबाहेर पडले नाही. सकाळी दोरखंड सोडून दत्तु कसाबसा घराबाहेर आला. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पहिल्या दरोडय़ाचा तपास लागला नसताना ही दुसरी घटना घडल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आधीच्या तपासासाठी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.