सेंद्रीय शेतमाल उत्पादन संस्था, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी समोरील कृषिविद्या भवन परिसरात आयोजित सेंद्रीय शेतमाल महोत्सवात ५० लाखांची विक्री झाली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २२ मे रोजी आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते पार पडले. या महोत्सवात गहू, तांदूळ, तुरीची डाळ, ज्वारी, बाजरी, बरबटी, मूग, तीळ, जवस, कांदे, प्राकृतिक गूळ, याशिवाय नाचणीचे पापड, शेवया, सरगुंडे, मुगवडय़ा, खडा मसाला, आल्याच्या वडय़ा, सेंद्रीय गूळ, अंबाडी पावडर, तांदळाचे पापड, लिंबाचे लोणचे, देशी गुलाब पाकळ्यांचा गुलकंद यांचा समावेश होता. या महोत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विदर्भातील चाळीस शेतकऱ्यांनी त्यांचे सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी ठेवले होते. रासायनिक खतयुक्त शेतमालामुळे नागरिकांना विविध परिणाम जाणवत आहे. त्यामुळे नागरिकही आता सेंद्रीय शेतमाल खरेदी करंण्यासाठी वळत आहे. त्यामुळे शहरात जेथे कुठे सेंद्रीय महोत्सव आयोजित केला जातो, तेथे खरेदीदारांची अफाट गर्दी दिसून येते.
२४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचा समारोप झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. अरविंद बोंदरे, विभागीय कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.के. खर्चे, सेंद्रीय शेतमाल उत्पादक संस्थेचे अध्यक्ष साहेबराव धोटे, सचिव डॉ. अशोक वर्मा, आत्माचे प्रकल्प संचालक पी.एम. शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी हा महोत्सव आणखी एक दोन दिवस सुरू ठेवावा, अशी इच्छा व्यक्त केली.