कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, पण कनिष्ठ श्रेणीत कार्यरत असणारेही योग्य ती शैक्षणिक अर्हता प्राप्त करून वरच्या श्रेणीत जाऊ शकतात, हे ठाणे महापालिकेतील ५६ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. महापालिका प्रशासनाने नुकत्याच एका आदेशान्वये या सर्वाना लिपिकपदी बढती दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या टेबलावर चहा, पाणी, फाइल्स तसेच अन्य सुविधा पुरविणाऱ्या शिपायांना आता स्वत:चे हक्काचे टेबल मिळाले आहे.
ठाणे महापालिकेतील बिगारी तसेच शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व दाखवून दिले असून या कर्मचाऱ्यांनी वर्षांनुवर्षे शिपाई तसेच बिगारी पदाच्या चाकोरीत न राहता अभ्यासाच्या जोरावर लिपिक पदापर्यंत मजल गाठली आहे. महापालिका प्रशासनाने दहावी, बारावी, पदवी तसेच टंकलेखन अवगत असणाऱ्या ५६ चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना लिपिक पदाची बढती दिली असून त्यामध्ये
शिपाई, बिगारी, आरक्षक, माळी, अटेंडट, सफाई कामगार, ड्रेसर, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे.
 यातील बहुतेक कर्मचाऱ्यांनी महापालिका सेवेत कार्यरत असताना अभ्यासाच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले असून त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने वर्षभरात अभियंता, लिपिक तसेच अन्य पदावर कार्यरत असणाऱ्या चारशेहून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना बढती देऊ केली आहे. दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, चतुर्थश्रेणीमध्ये तीन वर्षे सलग सेवा पूर्ण झालेले आणि टंकलेखनातील आवश्यक गती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र त्यामध्ये मराठी तसेच इंग्रजी, अशा दोन्ही भाषेत टंकलेखन येणे बंधनकारक होते. दरम्यान, राज्य शासनाने या निर्णयामध्ये नुकताच बदल केला असून त्यामध्ये मराठी किंवा इंग्रजी, यापैकी एका भाषेत टंकलेखन येणे बंधनकारक केले आहे. त्याच पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने चतुर्थश्रेणीतील ७० कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. ७० पैकी ५६ कर्मचाऱ्यांच्या बढतीचे आदेश काढण्यात आले असून उर्वरित १४ कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांना अद्याप बढती मिळू शकलेली नाही. मात्र कागदपत्रांची पूर्तता होताच त्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान लिपिकपदी बढती मिळालेल्या सर्वाना पुढील दोन वर्षांत एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा त्यांना त्यांच्या मूळ पदावर काम करावे लागणार आहे. महापालिका मुख्यालय, प्रभाग समित्या, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, उद्याने आदी ठिकाणी बढती मिळालेले ५६ कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.