वडाळा येथील ‘बॉम्बे डाइंग’ या बंद पडलेल्या गिरणीची सुमारे आठ एकर जागा वाडिया समूहाकडून ‘म्हाडा’ला मिळण्याची शक्यता आहे. या जागेची किंमत ८०० ते ९०० कोटी रुपये असून तिथे गिरणी कामगारांसाठी घरे बांधली जाणार आहे. येथे गिरणी कामगारांसाठी सुमारे ६ हजार आणि संक्रमण शिबीरार्थींसाठी २ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

विकास नियंत्रण नियम ५८ नुसार गिरणीच्या जमिनीचा पुनर्विकासासाठी वापर करण्यात येतो तेव्हा गिरणी मालकाकडून ‘म्हाडा’ आणि बृहन्मुंबई महापालिकेला प्रत्येकी १/३ जमीन दिली जाते आणि उरलेली जमीन मालकाला स्वत:कडे ठेवता येते. त्यामुळे वाडिया समूहाकडून ‘म्हाडा’ आणि मुंबई महापालिकेला प्रत्येकी ८ एकर जमीन मिळणार आहे. जमीन हस्तांतरण, मालमत्तेवरील नावात बदल, मिळालेल्या जमिनीवर कुंपण आणि अन्य कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण होतील.
‘म्हाडा’ने वाडिया समूहाकडे प्रभादेवी आणि वडाळा येथील दोन भूखंडांविषयी विचारणा केली होती. त्यावर कंपनीने वडाळा येथील भूखंड देण्याची तयार दाखविली असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. चटईक्षेत्र निर्देशांकाची मोजणी न करता या जागेची प्रतिचौरस फूट किंमत २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘म्हाडा’ला हा भूखंड मोफत मिळत असल्याने गिरणी कामगारांसाठी त्यावर घरे बांधल्यानंतर गिरणी कामगारांकडून घरासाठी आलेला बांधकाम खर्च घेण्यात येईल. बंद पडलेल्या गिरणीच्या जमिनीवर बांधण्यात येणारी ही घरे गिरणी कामगारांना मोफत मिळावीत, अशी गिरणी कामगारांची मागणी आहे. मात्र गिरणी कामगारांकडून बांधकामाचा खर्च घेण्यात येईल आणि अन्य काही सवलती देण्यात येणार असल्याचे म्हाडा सूत्रांकडून सांगण्यात आले.