सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी बहुतांश भागांत काहीशी विश्रांती घेतली. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ६६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून गंगापूर धरणातील जलसाठा अवघ्या काही दिवसांत ८० टक्क्यांवर पोहोचला. दारणा धरणाचा विसर्गही निम्म्याने कमी होऊन ११ हजार क्युसेक्सवर आला आहे.
प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने सलग दोन दिवस चांगलाच जोर पकडून नाशिकला झोडपून काढले. एकाच दिवसात ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. हंगामात प्रथमच नद्यानाले दुथडी भरून वाहू लागले. पावसाने दोन जणांचा बळी घेतला. सखल भागातील अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. आदल्या दिवशीच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. नाशिक शहरात दुपारनंतर त्याने विश्रांती घेतली. इतर भागांतही कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र होते. दारणा व गोदावरी नदीचा पूरही ओसरला आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ६६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६०४५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ या भागांत पावसाचे प्रमाण चांगले असले तरी नांदगाव, मालेगाव, देवळा, सिन्नर व बागलाण भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या काही अंशी मार्गी लागली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरची संख्याही कमी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५१ गावे आणि ३७३ वाडय़ांमध्ये १५२ टँकरमार्फत पाणी पुरविले जात आहे. धरणांच्या जलसाठे उंचाविण्यास पावसाने महत्त्वपूर्ण हातभार लावला. नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. यामुळे शहरावरील पाणी कपातीचे संकट दूर सारले जाईल. काश्यपी धरणात २५ टक्के, गौतमी गोदावरी ३०, पालखेड ९०, करंजवण ३८, वाघाड ५२, ओझरखेड १८, पुणेगाव ५६, दारणा ७८, भावली ९१, मुकणे २३, वालदेवी ५३, नांदूरमध्यमेश्वर ५४, कडवा ६४, आळंदी ४३, भोजापूर १०, चणकापूर ४६, पुनद ४७, हरणबारी ६८, केळझर ३६, गिरणा १० टक्के असा जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. साधारणत: दहा दिवसांत जिल्ह्यातील एकूण धरणांच्या जलसाठय़ात दुपटीने वाढ होऊन तो ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
रस्ते वाहतूक सुरळीत, रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस, कसारा-इगतपुरी दरम्यान लोहमार्गावर पडलेली दरड यासह उत्तर भारतात सुरू असलेला पाऊस याचा विपरीत परिणाम सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी मध्य रेल्वेची वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत होण्यात झाला. मनमाडहून मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा दोन ते बारा तासांच्या विलंबाने धावत आहेत. दुसरीकडे कसारा घाटातील मातीचा ढिगारा हटविण्याचे काम पूर्णत्वास गेल्याने गुरुवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. रेल्वे प्रवासात अडकलेल्या प्रवाशांनी रस्तेमार्गाने मुंबई गाठणे पसंत केले.
बुधवारी कसारा घाटात दरड कोसळून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तसेच इगतपुरी-कसारा दरम्यानच्या अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कसारा घाटात रस्ते वाहतुकीसाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्गावर दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सात ते आठ तासांच्या प्रयत्नांनंतर आदल्या दिवशी सायंकाळी वाहतुकीसाठी एक मार्ग खुला करण्यात आला. याच मार्गावरून दोन्हीकडील वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यानच्या काळात घाटातील जुन्या मार्गावरील मातीचे ढिगारे हटविण्यात आले. यामुळे गुरुवारी सकाळपासून कसारा घाटातील दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली. रेल्वे गाडय़ा प्रदीर्घ काळ विलंबाने धावत असल्याने अनेकांनी रस्ते मार्गाने मुंबई गाठणे पसंत केले. यामुळे बसस्थानकांवरही प्रवाशांची भलीमोठी झुंबड उडाली होती. इगतपुरी व कसारा घाटात पाऊस कायम आहे. दाट धुके दाटल्यामुळे वाहनधारकांना दिवे सुरू करून मार्गक्रमण करावे लागत आहे. दरड कोसळल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे लांब पल्ल्याच्या मुंबईला जाणाऱ्या गाडय़ांना पोहोचण्यास विलंब झाला तर रात्रीपासून उत्तर भारतातील पावसाने तिथून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी गाडय़ा विलंबाने धावत आहेत. काही रेल्वेगाडय़ा दोन तर काही तब्बल १२ तास विलंबाने धावत आहेत. स्थानकावर रेल्वेगाडय़ांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मनमाड व नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी ताटकळले. वाहतूक विस्कळीत असल्याने आणि तिचे सुरळीत होणे निसर्गावर अवलंबून असल्याने खुद्द रेल्वे प्रशासनही याबद्दल काही बोलण्यास तयार नाही. मनमाड स्थानकावरून मुंबईकडे जाणारी नागपूर-मुंबई (तीन तास विलंबाने), राजेंद्रनगर-मुंबई (चार तास), हावडा-मुंबई मेल (चार तास), जबलपूर-मुंबई गरीबरथ (तीन तास), मनमाड-नाशिक-कल्याण-पनवेल मंगला एक्स्प्रेस (चार तास) विलंबाने धावत आहेत. भुसावळकडे जाणाऱ्या कुर्ला-गोरखपूर (१४ तास), मुंबई-वाराणसी महानगरी (१० तास), कुर्ला-वाराणसी (१० तास), मुंबई-हावडा मेल (आठ तास), कुर्ला-हावडा शालीमार एक्स्प्रेस (सात तास), कुर्ला-राजेंद्रनगर (सात तास) कुर्ला-गोरखपूर (सात तास), मुंबई-अमृतसर-पठाणकोट (सात तास), मुंबई-राजेंद्रनगर (चार तास), कुर्ला-पुरी (दहा तास), मुंबई – सिकंदराबाद देवगिरी औरंगाबादकडे जाणारी गाडी दहा तास तर जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.