पंचवटीतील फुलेनगर परिसरात महानगरपालिका शाळेत टवाळखोरांनी घातलेला धुडगूस आणि त्यानंतर शाळा व्यवस्थापनास पोलीस यंत्रणेचा आलेला विचित्र अनुभव या घटनेची अनुक्रमे पालिका शिक्षण मंडळ तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. मुलींच्या या शाळेसह पालिकेच्या ७६ शाळांमध्ये दिवस व रात्र या सत्रात सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. तर शाळा व्यवस्थापनास आलेल्या अनुभवाची सत्यता तपासून पाहिली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
नागरिक आणि पोलीस यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे त्याच विभागातील काही घटकांमुळे या प्रक्रियेत अवरोध येत असल्याचे सांगितले जाते. पोलीस ठाण्यात आलेला अनुभव त्याच धाटणीचा असल्याची व्यवस्थापनाची भावना आहे. फुलेनगर येथे पालिकेची मुलींची शाळा आहे. या ठिकाणी सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घातला. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, या ठिकाणी शाळा व्यवस्थापनाला विचित्र अनुभवास सामोरे जावे लागले. तक्रारदाराला पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या वागणुकीवर ‘लोकसत्ता-नाशिक वृत्तान्त’ने प्रकाश टाकल्यानंतर बुधवारी नगरसेवक डॉ. विशाल घोलप तसेच शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी शाळेला भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या. पालिका शिक्षण मंडळाकडून पालिकेच्या ७६ शाळांमध्ये सकाळ व रात्र या दोन सत्रांत सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला असून आगामी सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे कुंवर यांनी सांगितले. दरम्यान, शाळा व्यवस्थापनास पोलीस ठाण्यात आलेल्या अनुभवाविषयी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची सत्यता तपासून कारवाई केली जाईल, असे सांगितले. या प्रकाराची चौकशी करण्याची सूचना पोलीस उपायुक्तांना करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कटू अनुभव आल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा, असेही सरंगल यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी अटक झालेल्या राहुल बेंडाळे, राजेश काळे, सागर खांडवे व रोहित उफाडे यांची बाल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.