पाच वर्षांपूर्वी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ठाणे जिल्ह्य़ात यंदा ८ लाख ६७ हजार ३०१ नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यापैकी सर्वाधिक ३ लाख ३३ हजार १२६ मतदार कल्याण, तर त्याखालोखाल २ लाख ६६ हजार ९० नवे मतदार ठाणे लोकसभा मतदारसंघात नोंदविले गेले आहेत. भिवंडीमध्ये २ लाख १३ हजार २०३ तर पालघरमध्ये ५४ हजार ८८२ नवे मतदार नोंदविले गेले आहेत. मतदारवाढीचे हे प्रमाण जवळपास १४ टक्के आहे.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या पुनर्रचनेनंतर ठाणे जिल्हा चार लोकसभा मतदारसंघांत विभागला गेला. जिल्ह्य़ातील चारही लोकसभा मतदारसंघ मिळून तेव्हा ६४ लाख १ हजार ५४७ मतदार होते. जिल्हा निवडणूक विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता जिल्ह्य़ात ७२ लाख ६८ हजार ८४८ मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनंतर २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत ठाणे देशात सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा ठरला. ठाणे जिल्ह्य़ात एक कोटी १० लाख लोकसंख्या नोंदवली गेली. आता तीन वर्षांनंतर ती सव्वा कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. देशातील वेगाने नागरीकरण होणाऱ्या जिल्ह्य़ात ठाणे अव्वल आहे. त्यातही ठाणे आणि कल्याण तालुक्यात नागरीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत तीन लाखांहून अधिक मतदारांची भर पडली आहे.
ठाण्याची लोकसंख्या गोव्याच्या सातपट
मुंबईच्या छायेत असल्याने वेगाने वाढणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाचा विभाजनाचा प्रश्न गेली १५ वर्षे प्रलंबित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आता लवकरच जिल्ह्य़ाचे विभाजन होणार असल्याची आश्वासने राजकीय पुढाऱ्यांनी जनतेला दिली होती. मात्र प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत विभाजनाचा मुहूर्त काही मिळाला नाही. आता तर विभाजनाऐवजी त्रिभाजन करण्याची टूम निघाली आहे. २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रालगत असलेल्या गोवा राज्याच्या तब्बल सातपट अधिक लोकसंख्या ठाणे जिल्ह्य़ात आहे. गोव्याची लोकसंख्या १४ लाख ५८ हजार ५४५ इतकी आहे. फक्त ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्याही त्यापेक्षा अधिक म्हणजे १८ लाख आहे.

मतदार- २००९
ठाणे- १८ लाख ६ हजार ८०३
कल्याण- १५ लाख ८८ हजार ५०७
भिवंडी- १४ लाख ८३ हजार १७६
पालघर- १५ लाख २३ हजार ६१.

मतदार-२०१४
ठाणे- २० लाख ७२ हजार ८९३
कल्याण- १९ लाख २१ हजार ६३३
भिवंडी- १६ लाख ९६ हजार ३७९
पालघर- १५ लाख ७७ हजार ९४३.