महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत मनसेचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, तर काँग्रेसचा एक अशा एकूण आठ सदस्यांची नावे महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केली.
या जागांसाठी उपरोक्त पक्षांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू होती. इच्छुकांची समजूत काढण्यासाठी अखेपर्यंत समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता पुढील आठवडय़ात स्थायी सभापतीची निवड केली जाणार आहे.
स्थायी समितीवर एकूण १६ सदस्य असून त्यातील आठ सदस्य दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे निवृत्त होतात. यामुळे रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा पार पडली. या पदावर वर्णी लावण्यासाठी अखेपर्यंत प्रयत्न झाल्यामुळे सभेपूर्वी बंद लखोटय़ातून ही नावे सादर करण्यात आली. त्यानुसार महापौरांनी मनसेकडून अनिल मटाले, यशवंत निकुळे, संगीता गायकवाड आणि रत्नमाला राणे यांची सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने छाया ठाकरे, नीलिमा आमले व शिवाजी चुंबळे, तर काँग्रेसने विमल पाटील यांना संधी दिली आहे. स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू होती. काँग्रेसने तर एका सदस्याच्या नियुक्तीसाठी मुंबईहून निरीक्षकांना पाठविले होते. मनसेच्या कोटय़ातून स्थायीवर जाण्यासाठी काहींनी प्रयत्न केले.
स्थायीच्या सभापतींची निवडणूक पुढील सप्ताहात होणार असून त्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू आहे. महापालिकेत भाजपने मनसेची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला होता.
त्या वेळी स्थायी सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याची तडजोड झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये अनेकांच्या आकाक्षांना धुमारे फुटले. त्याचा प्रभाव सदस्य निवडीत पाहावयास मिळाला. सत्ताधारी मनसेकडून गतवेळी दिलेले आश्वासन पाळले जाते की नाही याकडे सर्वाचे लक्ष आहे. सभापतीपदावर आपली वर्णी लागावी या दृष्टिकोनातून व्यूहरचना सुरू झाली आहे.