कुष्ठरुग्णांवर उपचार करणाऱ्या राज्यातील ८ स्वयंसेवी संस्थांना शासनाने वर्ष २०१३-१४ या वर्षांसाठी ५६ लाख ९५ हजार ६९४ रुपये मंजूर केले आहे. या संस्थांमध्ये विदर्भातील चार तर उर्वरित महाराष्ट्रातील चार संस्थांचा समावेश आहे.
ज्या स्वयंसेवी संस्थांमध्ये कुष्ठरुग्णांवर उपचार केले जातात, त्या संस्थांना प्रति कुष्ठरुग्णासाठी २ हजार २०० रुपये व दरमहा संस्थेने प्रत्यक्ष भरती केलेल्या रुग्णांप्रमाणे अनुदान देण्यात येते. स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्यासाठी ५ कोटी १ लाख रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी सुधारित अंदाजानुसार २ कोटी ३२ लाख ९९ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे. या अनुदानातून आठ संस्थांना ५६ लाख ९५ हजार ६९४ रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्य़ातील निंभोरा येथील लेप्रसी रिलिफ अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन या संस्थेला जानेवारी ते डिसेंबर २०१३ पर्यंत ५ लाख ८८ हजार ६३२ रुपये, अमरावती जिल्ह्यातील तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळ या संस्थेला जानेवारी ते डिसेंबर २०१३ पर्यंतचे २७ लाख १४ हजार ७८७ रुपये, तसेच याच जिल्ह्य़ातील कोठारा येथील दि. लेप्रसी मिशनला ७ लाख ६९ हजार ८५० रुपये, आणि वर्धा जिल्ह्य़ातील दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीला ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३ या दरम्यानचे ३ लाख ९४ हजार ९२६ रुपये अनुदान मंजूर झाले आहेत.  
उर्वरित महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्य़ातील अहमदनगर जिल्हा कुष्ठरोग निवारण समितीला ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३ पर्यंत २ लाख ३० हजार ६६५ रुपये, ठाणे जिल्ह्य़ातील वडोली-तलासरी येथील कुष्ठरोग निवारण रुग्णालयाला जानेवारी २०१३ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंत ७ लाख १० हजार ७३१ रुपये, मुंबई येथील एडय़ुलजी फ्रेमजी ऑलब्लेस निरामय निकेतन ट्रस्टला ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३ या दरम्यानचे ७५ हजार ३९० रुपये, सांगली जिल्ह्य़ातील मिरज येथील रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटलला ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३ या दरम्यानचे २ लाख १० हजार ७१३ रुपये अनुदान मंजूर झाले आहे. पुणे येथील सहसंचालकांनी (कुष्ठ व क्षय) वरील संस्थांनी अटी पूर्ण केल्याची खातरजमा करून अनुदान अदा करावे, असे आदेशही सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत.