दोन दिवस सतत पाऊस सुरू असल्याने गोपालक त्यांची गुरे चरावयास बाहेर नेऊ शकले नाही. चारा व पाणी न मिळाल्याने काटोल तालुक्यातील १६ गावात ८६ गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी त्यांची गुरे मरण पावल्याने आणखी संकटात सापडला आहे. दरम्यान, वेळेवर प्राथमिक उपचार मिळाल्याने ५० हून अधिक गुरांना वाचवण्यात यश आले आहे.
रविवार दुपारपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दुपापर्यंत सुरूच होता. त्यामुळे तीन दिवस गोपालक आपली गुरे चराईसाठी घेऊन जाऊ शकले नाही. घरचा कडबा, कुटार जून महिन्यातच संपले. त्यामुळे गुरांचा पोटमारा सुरूच होता. पाऊस उशिरा सुरू झाल्याने हिरवे गवतही गुरांना मिळू शकले नाही. परिणामी खायला चारा न मिळाल्याने असंख्य गुरे अशक्त झाली होती. त्यातत सतत तीन दिवस पाऊस सुरू असल्याने गोपालकांना आपली गुरे बाहेर नेताच आली नाही. त्यामुळे ८६ जनावरे मृत्युमुखी पडली. एवढया संख्येने गुरे दगावल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
२३ जुलैला डोरली भिंगारे येथील १२ गुरे दगावल्याची माहिती शासकीय पशु चिकित्सकांना मिळाली. दगावणाऱ्या गुरांमध्ये गायी, म्हशी, वासरांचा समावेश आहे. त्यानुसार त्यांनी तेथे धाव घेतली. अन्य आजारी गुरांवर उपचार सुरू केले. त्यामुळे अन्य जनावरे वाचवण्यात यश मिळाले. डोरली भिंगारे या गावाप्रमाणेच मसाळा १, चंदन-पारडी २, खैरी २, दोडकी १४, वसंतनगर २, हेटी ५, लाडगाव ९, मेटपांजरा २, पुसागोंदी ५, खापा ३, मरगसूर ११, कोंढाळी ८, भिलीवाडा ३, सोनपूर ६ आणि वाई येथे १ जनावर मृत्यूमुखी पडले. तालुक्यात एकाचवेळी एवढय़ा संख्येने गुरे मृत्यूमुखी पडल्याने गोपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत झालेल्या गुरांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. गुरांच्या हृदयात रक्ताची कमतरता असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
सलग दोन-तीन दिवस चारा आणि पाणी मिळाले नाही. त्यामुळे ही जनावरे डी-हाईड्रेशनची शिकार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या गावांमध्ये हा प्रकार आढळून आला तेथे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. वाणी यांनी भेट दिली असून योग्य त्या सूचना केल्या आहेत.
सध्या डॉ. अनिल ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक चमू अशक्त गुरांवर उपचार करीत आहेत. दरम्यान, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाने योग्य ते निर्देश दिले आहेत.