पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी यंदा रेल्वेने एक लाख १७ हजार वारकऱ्यांनी प्रवास करीत रेल्वे प्रशासनाला ८६ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले. यात्रेच्या काळात रेल्वेने विशेष गाडय़ांची सोय केली होती. त्यास वारकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यात्रा कालावधीत म्हणजे १४ ते २३ जुलैपर्यंत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाडय़ांच्या ७३ फेऱ्या केल्या होत्या. यात मिरज, दौंड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी भागांसाठी चालविण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाडय़ांतून एक लाख १७ हजार ९७९ वारकऱ्यांनी प्रवास केला. गतवर्षांच्या तुलनेने यंदा वारकरी प्रवाशांची वाढ दिसून आली. गतवर्षी रेल्वेला ६१ लाख ७६ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या वर्षी त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.