तपास पथकाने केलेल्या पाहणीत मध्यवर्ती कारागृहात आणखी ९ मोबाईल आणि १७ मोबाईलच्या बॅटरीज् सापडल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सापडलेल्या मोबाईलची संख्या १०९ वर जाऊन पोहोचली आहे. मध्यवर्ती कारागृहात अनियमितता असल्याचे वेळोवेळी जाहीर झाल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याची परिणीती ३१ मार्चच्या पहाटेला झाली. या दिवशी कारागृहातून पाच आरोपी पळून गेले. आज या घटनेला सतरा दिवस पूर्ण झाले असतानाही त्यांचा पोलिसांना शोध लागला नाही. या घटनेने संपूर्ण पोलीस दलाचीच नाचक्की झाली. या घटनेनंतर कारागृहाच्या पोलीस महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी पाहणी केली. तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी चौकशी केली. यावेळी कारागृहाची पाहणी केली असताना त्यांना दररोज मोबाईल सापडू लागले होते. आतापर्यंत केलेल्या पाहणीत १०० मोबाईल तर ५० हून अधिक बॅटऱ्या सापडल्या आहेत. हे मोबाईल प्रत्यक्ष कैद्यांकडे व कारागृह परिसरात आढळले आहेत. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या खतरनाक गुन्हेगारांसह कुख्यात गुन्हेगार आहेत. असे असताना येथील कैद्यांना सर्वच सोयी उपलब्ध होत असल्याच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत.
या कारागृहात कधीही काहीही होऊ शकते, असे संकेत यापूर्वी याच कारागृहातील काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी दिले होते.