पक्षीप्रेमी व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अर्थार्जनाचे केंद्रही ठरले आहे. वन विभागाने फारशा सोई सुविधा उपलब्ध केल्या नसताना अभयारण्यात पदवी शिक्षण घेत असलेले नऊ स्थानिक युवक प्रतिकूल स्थितीत ‘गाईड’ म्हणुन काम करत आहे. छंद म्हणून काम करताना संबंधितांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. एका गाईडने तर ‘नांदुरमध्यमेश्वर एक पानथळ जैवविविधता’ या पुस्तिकेद्वारे अभयारण्याला सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्नही चालविला आहे.
गुलाबी थंडीचे आगमण जसे होते, तसे देश विदेशातील विविध पक्ष्यांना नांदुरमध्यमेश्वर साद घालते. नदीच्या प्रवाहात गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले. जलाशयातील उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पानवनस्पतीसह शहराच्या गलबलाटापासून दुर असलेल्या हिरवळीच्या सानिध्यात पक्षी शांतपणे विसावण्यास सुरूवात झाली. सध्या अभयारण्यात श्वेत करकोचा, चमचा, दलदल हरिण, चतुरंग, राखी धनेश, मोर शराटी, कांडे करकोचा यासह विविध रंगसंगत आणि मनोहारी सौंदर्य लाभलेले जवळपास २४० पक्षी हक्काने स्थिरावले आहेत. हिवाळ्यातील चार महिने त्यांचा मुक्काम असतो. यामुळे पक्षी दर्शनासाठी सुटीच्या दिवशी चांगलीच गर्दी होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पुरेसा वाव असतांना अद्याप या ठिकाणी पुरेशा सोई-सुविधा नाहीत. पक्ष्यांची संख्या मोठी असली तरी त्यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक युवा पिढी ‘गाईड’ म्हणुन काम करत आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत गाईडला दिवसाकाठी प्रत्येकी २०० रुपयांची कमाई होत आहे. सध्या अभयारण्यात १९ ते २३ वयोगटातील नऊ मुले गाईड म्हणून काम करतात. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत ही मंडळी शिक्षण घेत आहे. सध्या शिक्षण घेताना काम करता यावे यासाठी पक्षी निरीक्षणाचा आपला छंद त्यांनी उपजिविका म्हणून निवडला आहे. वन विभागाकडून त्यांना दुर्बिणीशिवाय कुठलीच सुविधा दिली जात नाही. पिण्याच्या पाण्यासह सर्व गोष्टींसाठी परिसरात वणवण करावी लागते. काही वेळा पर्यटकांकडून दमदाटीचा प्रयत्न होतो. मात्र सरकारी अधिकारी हस्तक्षेप करत नसल्याने आहे त्या परिस्थितीत काम करण्याशिवाय त्यांच्या समोर कोणताही पर्याय नाही. तुटपुंज्या वेतनापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात रहावयास मिळते हा काही गाईडला आनंद महत्वाचा वाटत आहे. मात्र काहींनी ही वाट बदलण्याचा प्रयत्न केला आहे. यातील अमोल दराडे हा दोन वर्षांपासुन स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. हिवाळ्यात गाईड म्हणून काम करणे त्याला पसंत आहे. लहानपणापासुन असलेला पक्षी निरीक्षणाचा छंद यासाठी कामी आला. पक्षीप्रेमी प्रा. आनंद बोरा, विश्वरुप रहा यांच्या मार्गदर्शनामुळे कुठल्याही प्रकारचे शास्त्रशुध्द शिक्षण न घेता तो बाहेरगावहून आलेल्या पर्यटकांना विविध पक्षी कसे ओळखावे, त्यांच्या लकबी सांगतो. हा व्यवसाय काही दिवसांचा आहे. त्यातही शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळ तसेच सायंकाळी गर्दी असते. या कालावधीत दिवसाला साधारणत: ४०० रुपये मिळतात. मात्र ही कमाई तुटपुंजी आहे. करिअर म्हणुन गाईडचा विचार न करता मी स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला असे अमोल सांगतो. प्रमोद यानेही साधारणत: ४ वर्षांपासून गाईड म्हणून काम करण्यास सुरूवात केली आहे. पक्षी निरीक्षणाची आवड आहे. अभ्यासासोबत फावल्या वेळात शेतीचे काम करतो. मात्र या क्षेत्रातील अस्थैर्य त्याला सतावते. त्या दृष्टीने त्याने तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. पुढे चांगली संधी मिळाली तरी गाईड म्हणुन काम सुरूच राहील असे त्याने आर्वजुन सांगितले. आपल्या छंदातून काही सहकारी आणि पक्षीमित्रासोबत त्याने ‘नांदुरमध्यमेश्वर एक पानथळ जैवविविधता’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. ज्यात अभयारण्यातील वनस्पती, किटक, प्राणी, पक्षी यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. पुढे असेच काही करण्याचा त्याचा मानस आहे.