निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटना इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन)च्या लाल यादीत अतिशय चिंताजनक या वर्गवारीत येणाऱ्या जिप्स प्रजातीच्या गिधाडांची संख्या गेल्या दशकात ९९.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतात या प्रजातीची गिधाडे थोडय़ाफार संख्येत आहेत. विशेषत: आसाममधील सिवसागर येथील प्रजनन केंद्रात ही गिधाडे आहेत. मात्र, तेथेच विषबाधेमुळे मृत झालेले जनावर खाल्ल्याने तब्बल ५५ गिधाडांवर मृत्यू ओढवला.
सिवसागरमध्ये अलीकडेच एका मृत जनावराजवळ सुमारे ५५ गिधाडे मृतावस्थेत पडल्याची माहिती ‘बीएनएचएस’ला मिळाली. गिधाडांचे मृतदेह गवताळ प्रदेशात पडून असलेले गावकऱ्यांना दिसले आणि त्यांनी ही माहिती ‘बीएनएचएस’ला दिली. गावकऱ्यांनी पाहिले तेव्हा काही गिधाडे पूर्णपणे मृत्युमुखी तर काही मरणासन्न अवस्थेत होती. बीएनएचएसच्या चमुने या प्रकरणाचा मागोवा घेतला तेव्हा त्या मृत गाईवर विषप्रयोग झालेला होता. गिधाडांनी त्या गाईचे विषबाधित मृत शरीर खाल्ले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जगभरातच गेल्या काही वर्षांत गिधाडे स्वत:च्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहेत. त्यासाठीच गिधाड प्रजनन केंद्राची संकल्पना बीएनएचएसने अंमलात आणली. भारतात ज्या ठिकाणी ही गिधाड प्रजनन केंद्रे आहेत, त्या ठिकाणी ही प्रजाती टिकवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. विषप्रयोग किंवा डायक्लोफिनॅक या पशुवैद्यकीय औषधांचा जनावरांवर उपचारासाठी केला जाणारा वापर, हानीकारक औषधांचा वापर या ठिकाणी नाही. मात्र, सिवसागर येथे गिधाड प्रजनन केंद्राजवळच झालेल्या ५५ गिधाडांच्या मृत्यूने गिधाडांच्या या प्रजातीला आणि गिधाड वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बीएनएचएस या संस्थेला मोठा धक्का बसला आहे.
नामशेष होणाच्या मार्गावर असलेल्या गिधाडांसाठी प्रजनन केंद्र ही शेवटची आशा आहे. त्यांच्या अन्नसाखळीतून विषप्रयोग टाळण्यासाठी प्रजनन केंद्रे प्रभावी ठरली आहेत. डायक्लोफिनॅकमुळे गिधाडे नामशेष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पशुवैद्यकीय क्षेत्रात या औषधाच्या वापरावर बंदी घालण्यात आली. तरीही या औषधाचा वापर सुरूच असल्याचे आसाममधील या घटनेनंतर सिद्ध झाले आहे.