गणेशोत्सवाच्या काळात गणपतीच्या सजावटी, आरास, प्रसाद यांच्याबरोबरीने आरतीसंग्रहाचीही तितकीच गरज भासते. प्रत्येकालाच आरतीसंग्रह आपल्या सोबत कायमस्वरूपी ठेवणे शक्य होत नाही. अनेकदा छोटेखानी आरतीसंग्रह गहाळ होतात. गणेशोत्सवाच्या काळात दररोज उपयुक्त ठरणारी ही पुस्तके हरवल्यानंतर होणारा त्रास टाळण्यासाठी नवी मुंबईतील वाशी येथील विजय चिनगुंडे यांनी आरतीसंग्रहाचे अ‍ॅप्स विकसित केले असून मोबाइलच्या प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आरतीसंग्रह कायमस्वरूपी मोबाइलमध्ये राखणे आता शक्य होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात दैनंदिन वापरात असलेल्या आरत्या, श्लोक, मंत्रपुष्पांजली आणि मनाचे श्लोक या अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोबाइल फोनवर उपलब्ध होणार आहे.
वाशीतील विजय चिनगुंडे हे गेल्या दहा वर्षांपासून संकेतस्थळनिर्मिती आणि त्यानंतर मोबाइल अ‍ॅप्स विकसित करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी इस्कॉन या धार्मिक संस्थेच्या आरतीसंग्रह आणि गाण्यांचा अ‍ॅप्स बनवण्याचे काम आले होते. महिनाभरामध्ये धार्मिक गाणी आणि आरतीचा हा अ‍ॅप्स सुमारे पाच हजार जणांनी मोबाइल्समध्ये डाऊनलोड करून घेतला. या उपक्रमानंतर विजय यांना गणेशोत्सवाच्या काळात लागणाऱ्या आरतीसंग्रहाचा अ‍ॅप्स बनवण्याची कल्पना सुचली. गणेशोत्सव घरगुती असो वा सार्वजनिक आरतीसंग्रहाचा उपयोग सगळ्याच ठिकाणी होतो. मोबाइलच्या अ‍ॅप्सवरून एकाच ठिकाणी सगळ्या आरत्या उपलब्ध करून दिल्यास सर्वासाठी अ‍ॅप्स उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच त्यांनी ही कल्पना साकारली. आठवडाभरापूर्वी हा अ‍ॅप्स प्ले स्टोअरमध्ये दाखल झाला असून त्यामध्ये विविध अशा १७ आरत्यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती विजय चिनगुंडे यांनी दिली.

कसा आहे अ‍ॅप्स?
आरतीसंग्रह या अ‍ॅप्समध्ये गणपतीच्या चार आरत्या आहेत. त्यामध्ये सुखकर्ता दु:खहर्ता, शेंदूर लाल चढायो, जय जय जी गणराज, गजानना श्रीगणराय या आरत्यांचा समावेश आहे. शंकराची आरती, देवीची आरती, विठ्ठलाच्या दोन आरत्या, दत्ताची आरती, विष्णूची आरती, स्तोत्रांमध्ये गणपती अथर्वशीर्ष, गणेशस्तोत्र, मंत्रपुष्पांजली, संकटनाशन गणेशस्तोत्र आहेत. सर्व मनाचे श्लोक आणि प्रार्थनेमध्ये घालीन लोटांगण आणि सदा सर्वदा या दोन प्रार्थनांचा समावेश आहे. http://www.tinyurl.com/shreeaarti या लिंकवर हा अ‍ॅप्स डाऊनलोड करून घेता येणार आहे.

मोफत आणि उपयुक्त..
अ‍ॅप्सवर आरतीसंग्रह ही नावीन्यपूर्ण कल्पना असून यापूर्वी दक्षिण भारतातील अनेक आरतीसंग्रहाचे अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. मात्र गणपतीच्या सणाच्या निमित्ताने उपयुक्त ठरेल असा एकही आरतीसंग्रह प्ले स्टोअरवर उपलब्ध नव्हता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात हा विनामूल्य अ‍ॅप्स उपयुक्त ठरेल, असा विश्वास विजय चिनगुंडे यांना आहे.