शहरातील नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर विभागात गेली २४ वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा कलम ३७० विषयी सविस्तर माहिती देणारा देखावा सादर करून देशातील या संवेदनशील विषयाबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शौर्य आणि उतराई पुरस्कार देऊन गुणवंत ठाणेकरांचा सत्कारही संस्थेतर्फे केला जाणार आहे.
 हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली २४ वर्षे ठाण्यात सामाजिक दृष्टय़ा महत्त्वाच्या विषयांवर देखावे सादर करून प्रबोधनाची परंपरा चालवत आहे. यंदा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘कलम ३७०’ कलमाची मोठी चर्चा झाली. त्यामुळे हे ३७० कलम नेमके काय आहे, याची माहिती देखाव्याच्या माध्यमातून दिली जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मकतेचा जागर करण्याच्या हेतूने मंडळाने या विषयाची निवड केली असून गुरुवार २८ ऑगस्टपर्यंत सजावट पूर्ण होऊन गणेश चतुर्थीच्या सायंकाळी नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत मंडळाच्या वैशिष्टय़पूर्ण देखाव्यांना विविध पारितोषिके मिळाली असून कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईतूनही नागरिक देखावा पाहण्यासाठी येत असतात. संस्थेच्या वतीने यंदा २२ वर्ष नेत्रदानाची चळवळ चालवणाऱ्या श्रीपाद आगाशे यांना उतराई पुरस्कार देण्यात येणार आहे. तर कळवा येथे समाजबांधवांसाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या सुरज तिवारी, रवी सिंग, योगेश यादव, अतुल सिंग आणि विवेक दुबे या तरुणांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू जागृती सार्वजनिक मंडळाच्या वतीने देण्यात आली.