मुंबईकरांना गारेगार प्रवासाची हमी देऊनही ‘बेस्ट’च्या वातानुकूलित बसगाडय़ांचे अनेक मार्ग तोटय़ातच सुरू आहेत. हे मार्ग फायद्यात आणण्यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाने आता नामी शक्कल लढवली आहे. ‘बेस्ट’चे तोटय़ात चालणारे वातानुकूलित बसमार्ग बंद करून त्या मार्गावरील बसगाडय़ा काही कंपन्यांसाठी चालवता येऊ शकतील का, याबाबत आता ‘बेस्ट’ प्रशासन विचार करत आहे. त्या दृष्टीने मुंबई पोर्ट ट्रस्ट, सीप्झ येथील हिरे बाजार आदींशी बोलणे झाल्याचेही प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.
‘बेस्ट’च्या ताफ्यातील वातानुकूलित गाडय़ांचे मार्ग सध्या तोटय़ात चालत आहेत. ‘बेस्ट’ने केलेली तिकीट भाडेवाढ हे एक कारण असले, तरी इतर परिवहन सेवांकडे आलेल्या अत्याधुनिक बसगाडय़ांकडे प्रवासी वळल्याचेही चित्र आहे. मात्र हे वातानुकूलित मार्ग तोटय़ात चालत असल्याने ‘बेस्ट’ला वार्षकि २० ते ३० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे या वातानुकूलित गाडय़ांचे काय करायचे, हा प्रश्न ‘बेस्ट’ प्रशासनासमोर आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाने विविध कंपन्यांसह बोलणी सुरू केली आहेत. नुकतेच ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संचालकांशी बठक घेतली. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या वातानुकूलित बसगाडय़ा वापरता येऊ शकतात का, याची चाचपणी सध्या सुरू आहे. तसेच सीप्झ येथील हिरे बाजारातही तब्बल ४० ते ५० हजार लोक कामाला येतात. या कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित बससेवा चालवणे शक्य आहे का, याचा विचारही सुरू आहे. त्याबाबतच्या बठका होत असून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.
या गाडय़ा कंपन्यांसाठी चालल्या, तरी ‘बेस्ट’चेच कर्मचारी त्या गाडय़ांवर डय़ुटीला असतील. तसेच कर्मचारी मासिक पास काढून त्यातून प्रवास करू शकतील. कर्मचाऱ्यांना मासिक पाससाठी बेस्टच्या आगारांत यायला लागू नये, यासाठीही आम्ही खास सोय करणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. सीप्झ येथील हिरे बाजारातील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट सेवा देण्याचे नक्की झाल्यास सीप्झ येथेच पास देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. खासगी वाहतुकीपेक्षा लोकांना ‘बेस्ट’चा प्रवास विश्वासार्ह वाटतो. या विश्वासाचा योग्य वापर करून सध्या तोटय़ात असलेल्या वातानुकूलित बसगाडय़ा कंपन्यांसाठी चालवण्याची योजना नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.