गणेशोत्सवादरम्यान वातानुकूलित डबलडेकर गाडी चालवताना केलेल्या चुका दिवाळीत सुधारण्याचे धोरण मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. ही गाडी गणेशोत्सवात प्रीमियम दरांत चालवण्याचा महागडा प्रयोग फसल्यावर दिवाळीत ही गाडी साध्या दरांत चालवण्यात येणार आहे. तसेच ही गाडी साधारण दरांत चालणार असल्याने आता पाचपेक्षा अधिक थांबे घेणार आहे. या थांब्यांमध्ये याआधी कुडाळ आणि थिविम ही दोन स्थानके वगळण्यात आली होती. मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कुडाळ आणि थिविम या दोन्ही स्थानकांवर ही गाडी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
०२००५ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही डबलडेकर गाडी ३१ ऑक्टोबपर्यंत कुडाळ स्थानकात दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचून पाच मिनिटे थांबून मग पुढे रवाना होईल. ही गाडी थिविम स्थानकात दुपारी चार वाजता पोहोचून पाच मिनिटे थांबून पुढे रवाना होईल. १ नोव्हेंबरपासून मात्र ही गाडी कुडाळ येथे दुपारी सव्वा दोन वाजता तर थिविम स्थानकात दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी पोहोचून तेथून साडेतीन वाजता सुटेल. तर ०२००६ करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी थिविम स्थानकात पहाटे ६.१५ वाजता पोहोचून ६.२० ला सुटेल. कुडाळला सकाळी ७.१५ वाजता पोहोचून ७.२० ला सुटेल. १ नोव्हेंबरनंतर ही गाडी थिविम स्थानकात सकाळी ७.१२ ला येऊन ७.१७ ला सुटेल. तर कुडाळला सकाळी ८.०५ वाजता पोहोचून ८.१० वाजता सुटेल.