वाहतूक नियमांचे पालन न केल्याने केळवदजवळ शनिवारी रात्री सातजणांना जीव गमवावे लागल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोनही वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तेथील ठाणेदारांनी सांगितले. नागपूरच्या तिवारी व त्रिपाठी तसेच कामठीच्या मिश्रा परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गोरेवाडय़ातील एकाच कुटुंबातील चौघांवर गोरेवाडा येथील घाटावर तर रनाळा येथील तिघांवर कामठीच्या घाटावर शोकाकूल वातावरणात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांती राधिकाप्रसाद तिवारी, आकांक्षा सुनील तिवारी, नागेश अविनाश त्रिपाठी, अर्चना गणेश मिश्रा, रौनक गणेश मिश्रा व आशा शंकर मिश्रा ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. पीयूष शंकर मिश्रा हा नऊ वर्षांचा तर त्याचा लहान भाऊ छोटू या दोघांना धंतोलीतील न्यूऑन रुग्णालय तर क्षमा अविनाश त्रिपाठी यांच्यावर होप रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे केळवद पोलिसांनी सांगितले. अपघातग्रस्त सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. शहर पोलीस मुख्यालयातील शिपाई सुनील तिवारी यांच्याकडे कामठीचे गणेश रघुवीरप्रसाद मिश्रा त्यांच्या मारुती ओमनी (एमएच/४०/ए/२२४८) कारने आले होते. नातेवाईकांना घेऊन ते जामसावळीला दर्शनाला गेले. सुनील तिवारी यांना सुटी न मिळाल्याने ते गेले नाहीत.
दर्शन घेऊन परत येत असताना वेगात असलेली व्हॅन रस्त्यात उभ्या दहा चाकी टिप्परवर (एमएच/४०/वाय/३८२) आदळली. गणेश मिश्रा हा वाहन चालवत होता. हा अपघात एवढा भीषण होता की व्हॅनमधील प्रवासी बाहेर फेकले गेले. केवळ अंकिता सुनील तिवारी ही पाच वर्षांची मुलगी कारमध्ये अडकल्याने वाचली.
अपघाताचा तिला धक्का बसल्याने ती सुन्न झाली. व्हॅनचा चुराडा झाला. गेल्या वर्षी गोरेवाडा रिंग रोडवर झालेल्या अपघातात नागेशच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.
नागेशला दोन वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी लागली होती. गणेश एलआयसी एजंट होता.