उरण तालुक्याच्या पूर्व विभागाला जोडणाऱ्या खोपटा पुलाच्या उभारणीला सोळा वर्षे पूर्ण झाली असून या पुलावरील वाढता ताण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने नवा पूल उभारला आहे. मात्र अवजड वाहने जुन्याच पुलावरून विरुद्ध दिशेने जात असल्याने पुलावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील सूचना देणारे एकेरी दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेले असतानाही पुलावरून विरुद्ध दिशेने बेकायदा वाहतूक सुरू आहे.
जुन्या खोपटा पुलावरील अवजड वाहनांची संख्या वाढल्याने पुलावर अपघात होण्याची शक्यता वाढलेली होती. याच पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पूर्व विभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचप्रमाणे पुलावरील अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागलेले होते. त्यामुळे नव्या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. खोपटा परिसरातील गोदामात ये-जा करणारी अवजड वाहने जुन्याच पुलावरून ये-जा करीत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच वाहतूक विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थ रुपेश पाटील यांनी सांगितले. या संदर्भात उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.