हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मानेवाडा मार्गावरील ज्वेलर्स विजय ठवकर हत्याकांडातील एक आरोपी लखनसिंग मीरसिंग बावरी याला उच्च न्यायालयाचे न्या. एम.एल. तहलियानी यांनी जामीन मंजूर केला. 

सरकार पक्षानुसार विजय ठवकर हे त्यांच्या ठवकर ज्वेलर्स नावाच्या दुकानात बसले होते. ६ ऑक्टोबर २०१२ ला दुपारी १ वाजताच्या सुमारास तोंडाला कापड बांधून दोघे दुकानात आले होते. त्यांनी ठवकर आणि त्यांचा नोकर प्रसाद खेडीकर यांना चाकूच्या धाकावर दुकानातील माल आपल्या स्वाधीन करण्यास फर्मावले होते. त्यांचा प्रतिकार केला असता एकाने देशी कट्टय़ातून ठवकर यांच्यावर गोळी झाडली होती. दुसऱ्या आरोपीने नोकरावर चाकूने वार करून त्याला जखमी केले होते. गोळीबाराचा आवाज ऐकून इतर दुकानदार घटनास्थळी धावताच दोन्ही हल्लेखोर उभ्या असलेल्या मारुती कारमध्ये बसून अन्य साथीदारांसह पसार झाले होते. पोलिसांना घटनास्थळावर एका आरोपीचा मोबाईल आढळला होता. त्या आधारे पोलिसांनी लखनसिंग बावरी, त्याचा भाऊ दारासिंग, बन्नासिंग, जुल्फीसिंग आणि पंकजसिंग दुधानी यांना अटक केली होती. पुढे या सर्व आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. लखनसिंगच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्यात आले की, आरोपीचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. घटनेच्यावेळी तो बुटीबोरी येथील घरी होता. त्याने कोणत्याही आरोपीची मदत केलेली नाही. या आरोपीच्या गुन्ह्य़ातील सहभागाबाबत पोलिसांनी ठोस पुरावे गोळा केले नाहीत. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ ठरवून आरोपी लखनसिंग याला जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर.के. तिवारी, अ‍ॅड. डी.के. गवळी, तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी काम पाहिले.