एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. कुही तालुक्यातील चन्ना गावात घडलेल्या या घटनेकडे निवडणुकीच्या धामधुमीत कुणाचेही फारसे लक्ष गेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मुलीवर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.  
वसंता उरकुडा गायकवाड (४२) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला दोन मुले आहेत. १२ ऑक्टोबरला दुपारी वसंता दारू पिऊन घरी आला. त्याची नजर घराशेजारी राहणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलीवर पडली. यावेळी तिचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले होते. वसंता घरात शिरला आणि पीडित मुलीवर बलात्कार केला. दुपारच्या सुमारास या मुलीचे आई-वडील घरी आले. तेव्हा घडलेली घटना त्यांना कळली. यावेळी मुलीच्या कपडय़ावर रक्ताचे डाग दिसले तसेच ती बेशुद्ध पडली. त्यामुळे लगेच तिला उपचारासाठी वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिला रक्ताची गरज असल्याने तेथील डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्या मुलीला त्याच दिवशी दिघोरी चौकातील क्युअर ईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. त्यानंतर वेलतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तिसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. घटनेच्या चौथ्या दिवशी तिचा रक्तप्रवाह बंद करण्यात येथील डॉक्टरांना यश आले. तिला आतापर्यंत दोन रक्ताच्या पिशव्या आणि आठ सलाईनच्या बाटला लागल्या असून सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दुसरीकडे तिच्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रूच्या धारा कमी होत नाही. या घटनेनंतर चन्ना गावात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नागपुरातील निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव, सदस्य अविनाश निमकर, नरेश निमजे, विशाल मेहर, सुरेश जठ्ठलवार, सविता पांडे, मंगला धोटे, सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीच्या आईवडिलांशी भेट घेऊन त्यांना धीर दिला. समाजकल्याण विभागाच्या उपसंचालकांनी पीडित मुलीला शासकीय मदत तसेच संरक्षण मिळवून द्यावे, अशी विनंती समितीने केली आहे.