अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या पिंटय़ा कृष्णा भोईर (२०) या कुख्यात गुंडाला कल्याण गुन्हे शाखेने सुमारे वर्षभरानंतर अटक केली आहे.
२० सप्टेंबर २०१३ रोजी कल्याणच्या शिळ मार्गावरील कातकरी वाडी येथे घराबाहेर खेळत असलेल्या १० वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. येथील स्थानिक गुंड पिंटय़ा भोईर याने हा बलात्कार केल्याचा आरोप होता. मात्र घटनेनंतर तो फरारी झाला होता.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र फरारी भोईर पोलिसांच्या तावडीत येत नव्हता. आरोपी सापडत नसल्याने परिसरात पोलिसांविरोधात संतापाचे वातावरण होते.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
भोईर पिसवली गावात येणार असल्याची माहिती मिळताच धुमाळ यांच्या पथकाने त्याला अटक केली.
भोईर याच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांत सोनसाखळी चोरी तसेच घरफोडय़ांचे गुन्हेही दाखल आहेत. तब्बल ११ महिने त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता.