एमआयडीसी परिसरातील दिघा येथील विष्णूनगरमध्ये विश्वकर्मा कंपनीच्या भिंतीला लागून अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या गाळे व सुभाषनगर येथील मोकळया भूखंडावर उभारण्यात आलेल्या १०० झोपडय़ा बुधवारी एमआयडीसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केल्या.
दिघा विभागात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले असताना विष्णूनगर येथील कंपनीला लागून ७ अनधिकृत गाळे भूमाफियाकडून बांधण्यात येत होते. या गाळयावर एमआयडीसीने निवडणुकीच्या आगोदर कारवाई केली होती. पण निवडणुकीच्या काळामध्ये हे गाळे पुन्हा बांधण्यात आल्याने एमआयडीसीने आज पुन्हा या गाळयावर कारवाई केली. निवडणुकीच्या काळात सुभाषनगर येथील एमआयडीसीच्या मोकळया भूखंडावर अनधिकृत झोपडय़ा बांधण्यात आल्या होत्या. त्याही जमीनदोस्त करून एमआयडीसीचा भूखंड मोकळा करण्यात आला. एमआयडीसीच्या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी मोकळया भूखंडावर सूचना करणारे एमआयडीसीचे फलक लावण्यात येतील, असे एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी यांनी सांगितले आहे.