जुलै संपत आला असतानाही तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पीक वाया गेले असून चारा-पाण्याचे संकट उभे आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असून त्यांनी आपल्या कार्यस्थळी व कार्यालयातच थांबण्याचे आदेश आ. शिरीष कोतवाल यांनी दिले आहेत. येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी तहसीलदारांना दिले.
देवळा तालुक्यात आतापर्यंत केवळ ५७ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. बैठकीस उपस्थित अनेकांनी तहसीलदार, वीजवितरण कंपनी, कृषी विभाग, पाटबंधारे विभागावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. तर लोहणेर येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात तहसीलदारांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला. वीजवितरण कंपनीसंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जात नाही. ८० टक्के वीज देयक भरण्याची अट शासनाने शिथिल केली असतानाही रोहित्र अद्याप दिले नाहीत. यासंदर्भात बैठकीत कंपनीचे देवळा विभाग अधिकारी घुमरे यांनी अपूर्ण माहिती व उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आमदारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच चणकापूर उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम डिझेलअभावी बंद असल्याचा प्रकार या वेळी बैठकीत उघडकीस आला. सदर कालव्याची वहनक्षमता वाढविण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाने लोकप्रतिनिधींना व जनतेला दिली नसल्याचा खेद व्यक्त करीत आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सदर प्रकाराची तातडीने सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले. चणकापूर उजव्या कालव्यासंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासनही कोतवाल यांनी दिले. तालुक्यातील उमराणे, तीसगाव, कुंभाडे, गिरणारे, वऱ्हाळे आदी गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी चुकीचे पंचनामे झाल्याची व मुदतीत तक्रार देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप कृषी विभागावर केला.
देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा, देवळ्यातील दुय्यम निबंधकांविरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांची त्वरित बदली करावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी आ. कोतवाल यांनी दुष्काळी परिस्थिती पाहता ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून देण्याची सूचना केली.