दुष्काळी स्थिती असतानाही विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने परिक्षाशुल्क वसूल करणाऱ्या जिल्ह्य़ातील महाविद्यालयांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा छात्र भारतीचे शहराध्यक्ष केदार भोपे यांनी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भोपे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना दुष्काळी जाहीर करून तेथील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्य़ात अशी एकूण ६३६ गावे आहेत. त्या गावांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची मागणी करणेच गैर आहे, मात्र तरीही शहर व जिल्ह्य़ातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना विविध कारणे सांगत परीक्षा शुल्क मागत आहेत.