डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागाने संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे या भागात दिवसरात्र ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांची पळापळ झाली आहे. फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी बदलल्यामुळे ही कारवाई सुरू झाली असल्याचे पालिकेतून समजते.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून बसत असल्याने नागरिकांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी रस्ता नसतो. काही फेरीवाल्यांचे काही पालिका कर्मचाऱ्यांशी वर्षांनुवर्ष ‘ऋणाणुबंध’ निर्माण झाले होते. पालिका अधिकाऱ्यांनी यावर उपाय म्हणून फेरीवाला हटाव पथकातील काही जुन्या कर्मचाऱ्यांना बदलून त्यांच्या जागी नवीन कर्मचारी तैनात केले आहेत. हे कर्मचारी फेरीवाल्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता रस्ते, पदपथ अडवले म्हणून त्यांचे सामान जप्त करण्याची मोहिम हाती घेत आहेत. दररोज टेम्पोभर माल फेरीवाल्यांकडून जप्त केला जात आहे.
फेरीवाल्यांचे काही नेते जप्त केलेले सामान सोडवण्यासाठी पालिकेत फेऱ्या मारतात. त्यांनाही प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांच्याकडून कोणतीही दाद दिली जात नाही. पालिकेच्या ‘ग’ प्रभागातून दिलीप भंडारी, ‘फ’ प्रभागातून संजय कुमावत हे फेरीवाले हटाव पथकाचे पथक प्रमुख आहेत. संयुक्तपणे हे दोघेही आपल्या पथकासह सकाळ, संध्याकाळ कारवाई करीत असल्याने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाला आहे. या भागातील काही फेरीवाले भाई असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असे पथक प्रमुखांनी सांगितले.
ही कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना कोठेही फेरीवाल्यांचा अडथळा वाटत असेल तर त्यांनी तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असे ग प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले.
प्रशासनाने सोपवलेली जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. काही फेरीवाल्यांकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आम्ही दाद देत नाही, असे दिलीप भंडारी व संजय कुमावत यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेत सतत कारवाई करून पथक प्रमुख बाजीराव आहेर यांच्या पथकाने पश्चिम रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना तीनशे मीटरच्या बाहेर हटवल्याबद्दल आहेर यांच्या पथकाचा पालिकेत गौरव करण्याची सूचना एकही अधिकारी, नगरसेवक करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.