लोकांच्या मालमत्तेला व जीविताला जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून धोका निर्माण होतो, तेव्हा अशा आरोपीच्या विरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई केली जाते. गेल्या सव्वा वर्षांत शहरातील अशा ३७ आरोपींच्या विरुद्ध ‘मोका’नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शस्त्राच्या धाकावर दहशत पसरवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, शस्त्राच्या धाकावर लूटमार करणे, खंडणी मागणे, संपत्तीची नासधूस करणे, हे गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधात ‘मोका’ लावला जातो. पोलीस उपायुक्त किंवा पोलीस आयुक्त अशा गुन्हेगाराविरुद्ध मोकान्वये कारवाई करून त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठवतात. न्यायालयाने मंजुरी प्रदान केली तर दोन वर्षे व त्याहून अधिक दिवस शिक्षा भोगावी लागते. परंतु मोका कारवाईतील अनेक गुन्हेगार कारागृहातून लवकरच बाहेर येतात आणि पुन्हा नव्याने गुन्हेगारी सुरू करतात. गेल्या सव्वा वर्षांत म्हणजे १ जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत शहरातील ३७ गुन्हेगारांवर मोकान्वये कारवाई करण्यात आली आल्याची माहिती गुन्हे शाखेने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली आहे.
गेल्या सव्वा वर्षांत शहरातील तीन माजी मंत्री आणि एका विद्यमान आमदारांसह १० नगरसेवकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहितीही एका प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली. माजी मंत्र्यांमध्ये अनिस अहमद, नितीन राऊत व सुलेखा कुंभारे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अनुक्रमे गणेशपेठ, सोनेगाव आणि पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. विद्यमान आमदारामध्ये डॉ. मिलिंद माने यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तीन माजी मंत्र्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मुंबई पोलीस कायद्यान्वये आहे. डॉ. माने यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या नगरसेवकांवरही मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे दाखल असणाऱ्यांमध्ये रमेश पुणेकर, संजय महाकाळकर, मालु वनवे, बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर, पुरुषोत्तम हजारे, प्रफुल्ल गुडधे, संदीप जोशी, आभा पांडे, विकास ठाकरे, संदीप सहारे या दहा नगरसेवकांचा समावेश आहे.
वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू असताना नागपूर शहरात १२ गुन्हे दाखल करण्यात येऊन ३३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून २३ लाख ७५ हजार २७० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला होता. यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी हे क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावत होते. गेल्या तीन महिन्यात बॉटनीकल गार्डनमध्ये ९ जणांना तर फुटाळा तलावावर ८ जणांविरुद्ध छेडखानीचे गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली.