नवी मुंबई परिसरात एमआयडीसीच्या आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी अनधिकृत इमारतींच्या माडय़ा उभारल्या आहेत. आरक्षित जागेवर प्राथमिक स्वरूपात अनधिकृत इमारती उभ्या राहत असताना त्यावर कारवाई करणे अनिवार्य आहे. मात्र नेहमीच पोलीस फौजफाटा मिळत नसल्याची कारणे पुढे करीत एमआयडीसीचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने आजमितीस मोकळे भूखंड भूमाफियांच्या घशात गेले आहेत. आता या गगनभेदी इमारतींवर एमआयडीसी दिवाळीनंतर कारवाईचा सपाटा सुरू करणार आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र या इमारतींवर सुरुवातीलाच कारवाई करण्यात न आल्याने शेकडो कुटुंबांचा संसार आता रस्त्यावर येणार आहे.
सरकारी जमिनी बिल्डरांना आंदण मिळाल्यासारखी अवस्था आता नवी मुंबई शहरात झाली आहे. सिडकोच्या जमिनींनंतर एमआयडीसीच्या जमिनींवर येथील भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी टाकली आहे. मागील दोन महिन्यांपासून आचारसंहितेचा मुबलक मोका साधत बिल्डरांनी रातोरात शहरात अनधिकृत इमारती उभारल्या आहेत. शहरातील, गणपती पाडा, विटावा, दिघा, यादवनगर, चिंचपाडा या ठिकाणी राजकीय नेत्यांना हाताशी धरीत बिल्डरांनी गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत. इमारत रातोरात बांधायची आणि त्यात नागरिकांना वास्तव्यास ठेवायचे आणि जागा गिळंकृत करायची, असा जोखमीचा धंदा सध्या शहरात बोकाळला आहे. या इमारतींत कर्ज काढून नवी मुंबईत स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे स्वप्न भंगणार आहे. पै-पै गोळा करीत जमवलेला पैसा आणि घराचे स्वप्न एमआयडीसीच्या चुकीमुळे कवडीमोल होणार आहे. या इमारतींना सुरुवातीलाच कारवाई करण्याचे नियमानुरूप असताना अधिकाऱ्यांनी मात्र काही ठिकाणी थातूरमातूर कारवाई केली आहे. काही सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या तक्रारीची नोंद करीत नोटिसीचे आगाऊ फर्मान बजावले आहे. इमारतींचे इमले आता डौलाने उभे थाटल्यानंतर एमआयडीसीचे प्रशासन जागे झाले आहे. एमआयडीसी दिवाळीनंतर लगेचच कारवाईचा सपाटा सुरू करणार आहेत. मात्र ही कारवाई आता केवळ शासकीय दिखाव्यासाठी केली जाणार आहे. इमारत उभी होत असताना कानाडोळा करायचा आणि मग अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याची आरडाओरड करीत सरकारी फौजफाटा घेत थातूरमातूर कारवाईचा बगडा उगारायचा, या एमआयडीसीच्या दुटप्पी भूमिकेमुळे भूमाफियाचे उखळ पांढरे झाले आहे. मात्र पोटाला चिमटा काढून घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमवलेला पैसा बिल्डरांच्या घाशात जाऊन संसार उद्ध्ववस्त होणार असल्याने सर्वसामान्यांच्या फसवणुकीला जबाबदार कोण, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.  
नवी मुंबई शहरातील एमआयडीसीच्या जागेवर बिल्डरांनी इमारती उभारल्या आहेत. ही वास्तव परिस्थिती आहे. निवडणुकीच्या काळात पोलीस बदोबस्त मिळत नसल्याने थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु होणार आहे.  एमआयडीसीच्या जागांना सरंक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी फलक उभारण्यात येणार आहे.